"लाच"
या विषयी काय आणि किती बोलावे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला,पाहिला असेलच. असेच मी पण काही अनुभव आज आपल्या समोर ठेवत आहे.
एका मराठी चित्रपटात म्हणजे कदाचित माझ्या पेक्षा तुम्हाला त्याचे नाव पटकन आठवेल. पण मला त्यातील एक प्रसंग मात्र पक्का आठवतो.
पांढरेss...लुकतुकेss...पांढरे लाच घेऊन काय काय नवनवीन वस्तू घरात आणतो...वैगरे वैगरे....
"लाच ही नेहमी लाथ असते" असे माझे बाबा नेहमी म्हणायचे. याच संस्कारात लहान पणापासून मी देखील वाढलो. माझे आजोबा हे त्या काळी ट्रेझरी ऑफिसर होते. त्यांचे एक चूलत भाऊ हे देखील असेच सरकारी नोकरीत होते. हुद्द्याने, मानाने दोघे पण उच्चपदस्थ होते.
" आमच्या ह्यांनी आणि भाऊजींनी कधी कोणाकडून काही घेतले नाही. आयुष्यभर मानाने आणि नियमाने जगले, कोणाचं म्हणून घेतल नाही ( म्हणजे कोणी त्यांना नावं ठेवले नाहीत)" असे माझी आज्जी मला सांगत असे.
घरातील असे वातावरण, त्यात परत स्वयंसेवक मग काय!!! एकसे भले दो असेच झाले. लहान वयात झालेले संस्कार सोबत घेऊन शिक्षणासाठी पुण्यात आलो. कधी कोणाला लाच देणे नको आणि आपण पण घेणे नको. ( ना खाऊंगा...ना खाने दुंगा - इति श्री पंतप्रधान)
आमच्या घरी आईने मेहनतीने विकत घेतलेली कायनेटिक लूना होती. ती मला पुण्यात वापरता येईल यासाठी बाबांनी पुण्यात पाठवली. काही महिने पुण्यात मी वापरली देखील. पण कदाचित पुण्याचे पेट्रोल तिला पचले नसावे. अगदी जसे आपल्याला बाहेर गावी गेल्यावर तिथलं पाणी पचत नाही. अगदी तसेच काहीसे लूनाच्या बाबत झाले. ती एकदिवस चोरीला गेली.
मी शाखेच्या वार्षिक उत्सवात (गॅदरिंग, म्हणा हवे तर) होतो. मैदानात सगळे कार्यक्रम सुरू होते. अचानक लाईट गेले. मैदानात अंधार, रस्त्यावर अंधार, सगळीकडे काळोख झाला. पण आमचा कार्यक्रम तशात देखील सुरूच होता.
सगळं नीट पार पडत असताना कोणाची नजर लागू नये म्हणूनच कदाचित अंधार झाला असावा. त्या अंधारात पण कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रम संपला तसे सगळी आवरासावर...सगळ्यांच्या गप्पा...जवळ जवळ दोन तास उत्सव झाला. तरी कोणी न कंटाळता अजून मैदानावर होते.
" चला आता निघू" असे म्हणतं सगळे मैदानाबाहेर आलो...आणि ...काय लुना गायब!!!
कधी कोणी नेली काहीच समजले नाही.
गलितगात्र अवस्थेत प्रभातरोड वरील पोलीस चौकीत रीतसर तक्रार दाखल करायला आम्ही काही मित्र, ज्येष्ठ शिक्षक असे आलो.
" अरे या या शिक्षक" तरुण हवालदार बोलला.
आमच्या बऱ्याच जणांच्या अंगावर शाखेचा पूर्ण गणवेश होता ( तेव्हा हाफ पँट होती )
आम्हाला चौकीत येताना पाहत तरुण पोलीस हवालदार खुर्चीतून उठत म्हणाला होता.
मला वाटले आमच्या सोबत जे ज्येष्ठ शिक्षक होते त्यांना तो हवालदार ओळखत असेल.
" एक तक्रार दाखल करायला आम्ही आलो आहोत." शिक्षक म्हणाले. खरं तर त्यांची या तरुण हवालदार सोबत कोणतीच ओळख नव्हती.
" बसा की, अहो मी पण स्वयंसेवक आहे. आमच्या मंगळवार पेठेमध्ये वस्तीत एक शाखा भारायची. तिथे जात होतो." तो तरुण हवालदार आनंदून बोलत होता. "नुकताच लागलो डिपार्टमेंट मध्ये, पण हे सगळे शाखेच्या शिस्तीमुळे झालं बर का!!"
रात्री जवळ जवळ दहा वाजता, गप्पा मारत मारत मी माझी लुना चोरीला गेली. अशी रीतसर तक्रार दाखल केली आणि घरी सर्व हकीकत कळवली.
माझा अनेक महिने एकच उद्योग सुरू होता. कॉलेज...मग कधी प्रभात रोड पोलीस चौकी..मग डेक्कन पोलीस चौकी..घरी फोन....असे अनेक महिने सुरू होते. पण चौकीतून काही उत्तर येत नव्हते. तसे गाडीचा विमा होता. पोलीस तक्रार दाखल केलेली प्रत ( FIR ) बाबांना पाठवली होती..आणि त्यांनी विम्यासाठी अर्ज दाखल केला होता.
असेच अनेक महिने गेले आणि मला एक नवीन माहिती समजली. ती म्हणजे गाडीचा कोर्टाकडून एक शोध रिपोर्ट ( Search Report) येतो. हा रिपोर्ट साधारण तीन महिन्यात गाडी मिळाली नाही की आपल्याला मिळतो. पण जर हा रिपोर्ट आला नाही तर विम्याची रक्कम काही मिळत नाही. मग काय या रिपोर्टचे महत्व...त्यासाठी अधिकारी लोकांचे महत्व हे सांगायला नकोच.
अनेक दिवसांनी कंपनीतून विम्याच्या अपेक्षित रक्कमेचा धनादेश बाबांना मिळाला.
"बहुदा दिले नसतील तरी मी विचारतो, आणि सांगतो"
बाबांनी त्या विमा कंपनी मधूनच मला फोन करून विचारले.
खरंतर लाच घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहेच पण आपण सामान्य माणसं आपला वेळ, मेहनत, त्रास वाचवण्यासाठी त्याचा वापर करत असतो. पण आत्मसन्मान जर टिकवायचा असेल तर आपण हे टाळले पाहिजे. अजून एक उदाहरण देतो या आत्मसन्माना बाबत.
शिवाजी महाराज पन्हाळा किल्ला येथे वेढ्यात अडकले होते. सिद्दी जौहर या मातब्बर सरदाराने त्यांची कोंडी केलेली होती. तरी देखील त्याच्या वेढ्यातून महाराज निसटले. बाजी प्रभू देशपांडे यांनी अलौकिक शौर्य गाजवून आपला देहत्याग केला. हे आपल्याला माहीत आहेच. पण याच्या पुढे काय झाले? सिद्दी जौहरने वेढा तसाच चालू ठेवला आणि एक दिवस पन्हाळा किल्ला त्याला मिळाला, म्हणजे आतील मावळ्यांनी महाराजांच्या आज्ञेने तो त्याला दिला.कारण मावळ्यांची अजून उपासमार आणि नाहक जीवितहानी होऊ नये याचसाठी महाराजांनी ही आज्ञा दिली असावी.
"तरी देखील तो फितूर झाला","त्याने शिवाजी महाराज यांना पन्हाळा किल्ल्यामधून पळून जावू दिले","असा कसा सहज पन्हाळा किल्ला त्याला मिळाला?" याचाच अर्थ त्याने लाच घेतली अशी खात्री त्याच्यावर मत्सर करणाऱ्या सरदार आणि अल्ली आदिलशाह यांची झाली. ( संदर्भ - वा.सी.बेंद्रे आणि ब.म. पुरंदरे ) खरंतर सिद्दी जौहर हा अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावंत होता.
आपण लाच घेतली हे खोटे आरोप त्याला सहन झाले नाहीत. आपला आत्मसन्मान त्याला गप्प बसू देईना. शेवटी त्याने यातून मुक्त व्हावे म्हणून आत्महत्या केली. असे इतिहासात दाखले आहेत.( संदर्भ -ब.म. पुरंदरे )
आज कोणा कोणावर आणि कसे कसे आरोप होतात, ते न्यायालयात सिद्ध होतात. याबाबत बोलणे नकोच. तरी देखील या आरोपीला कसलीच लाज वाटत नाही. लाचेची लाज वाटायचं सोडून ते राजरोज परत आपल्या पदावर, सत्तेत बसतात.
मला या निम्मित इतकेच सांगायचे आहे की लाच हा शब्द आपल्या अंगाला कधीही न शिवावा...
९०११०९६२५०




खरंच भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असे मनात कोरले जात आहे आजकाल.
ReplyDeleteछान लेख आहे !!!
Apratim. Siddi jauhar chi ghatana lakshat navhati. Athavan karun dili ya lekhane. Sundar lekhan. Dhanyawad
ReplyDeleteVery well written. Know you since childhood, you have never done any kind of unethical things under any circumstances. Keep writing ! All the best
ReplyDelete