"काय रे!!!व्यवसायची काही कामे बाकी आहेत का?" समोरून मामाचा फोन वर प्रश्न आला.
"आहेत जरा..पण बोल न काय ते?" मी त्याला प्रती प्रश्न विचारला.
"उरक...काम...आणि ये मंगळवारी तळेगावला दुपारी दोन पर्यंत"
अशा तुटक निरोपामुळे मी पण जरा अचंबित होऊनच, पण तरी त्याला परत विचारले..."अरे काय ते नीट सांग की?"
"महाराजांचे लय स्ट्राँग बोलावणे आले आहे" तो आनंदात म्हणाला.
खर तर तो गिरनार बाबत बोलत होता. दर वर्षी कार्तिक एकादशी (तुळशी विवाह) ते पौर्णिमा अशा पाच दिवसात श्री गिरनार परिक्रमा असते. पूर्ण जंगलातून होणारी ही परिक्रमा मागील वर्षी करोनामुळे झाली नव्हती. पण जसे महाराष्ट्रात कोणाला निरोप न देता आपोआप वारकरी आळंदी आणि देहू येथे जमायला सुरुवात करतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला पायी वारी करून जातात. तसेच काहीसे या गिरनार पर्वताच्या परिक्रेमेसाठी सर्व साधू, संन्यासी, स्थानिक भक्त, बाहेर गावी असलेले दत्त उपासक असे सगळे गोळा होतात.
मामा आणि त्याचे मित्र जाणार होतेच. पण मला उशिरा समजले आणि माझा नंबर लागला नाही. स्वतंत्रपणे गाडीचे आरक्षण मिळवण्याचा मी बराच प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही आणि यावर्षी जाता येणार नाही अशी मनाची समजूत करून शांत बसलो आणि आपल्या उद्योगाला लागलो. पण त्या दिवशी त्याचा फोन आला तेव्हा परत एकदा गुरूंची ताकद कळाली आपली फक्त इच्छा शक्ती पाहिजे, बाकी सर्व 'ते'( श्री गुरुदेव दत्त) करून घेतात हे मी कुठे तरी वाचले होते. त्याची आज प्रचीती आली.

गिरनार तसे पाहिले तर एक गुरुशिखर,सेवा,समर्पण, अध्यात्म, ट्रेक, निसर्ग असे अनेक प्रकारात मोडते. महाराष्ट्राच्या लागून असलेल्या गुजरात राज्यात जुनागड संस्थानात हे क्षेत्र येते. सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीतून भारतात विलीन झालेले असे हे संस्थान आहे.
"माझा कसा काय नंबर लागला रे?"मी मामाला निघताना विचारले.
"एक जण गळाला, त्याचे तिकीट होतेच...आणि महाराजांनी सेवा करू घ्यायला बोलावले बसss...आता चला" पाठीवर थाप देत मामा म्हणाला.
खरंच आमच्या कुटुंबात ही दत्तसेवा, गुरूभक्ती, आणि गुरूसेवा ही मागिल तीन चार पिढ्यांपासून आलेली आहे. आजोबा, बाबा आणि आता मी. सर्व जण गुरुचरणी कायम लिन आहोत. गुरुचरित्र पारायण, गुरुसेवा ही कदाचित आमच्या मूळ पुरुषाकडून आली असावी.
श्री गुरुचरित्र मध्ये एका अध्यायात एका व्याधी ग्रस्त विप्राला महाराज शुष्क काष्ट याची सेवा करायला सांगून त्याला व्याधीमुक्त करतात( अध्याय ४०वा) तो विप्र म्हणजेच ' गार्ग्य' गोत्र, हेच आमचे गोत्र आहे. म्हणजेच कदाचित मूळ पुरुषाचा उद्धार झाला आणि आमच्या गोत्रत गुरुभक्ती सुरू झाली असावी. म्हणून कदाचित आम्हा सर्वांना ही गुरुसेवा करण्याची संधी, बुध्दी मिळाली असेल.
कोण्या एका पुस्तकात वाचले होते की तुम्ही फक्त मनःपूर्वक दत्त महाराजांना शरण जावे आणि मला गिरनारला घेऊन जावे असे मागणे मागावे...बाकी सर्व कामे आणि मार्ग ' ते ' च दाखवतात. अगदी तसाच हा प्रवास सुरू झाला. रेल्वेचे तिकीट होते, पण ते कन्फर्म नव्हते. त्यामुळे गाडीत प्रवेश मिळाला खरा, पण दारात बसून प्रवास सुरू झाला. वापी स्टेशन आले तसे एक एक बर्थ रिकामा होत गेला आणि चक्क सगळ्यांना पुढील प्रवास झोपून करता आला. गिरनारला जाण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथून रेल्वेने जुनागडला उतरावे लागते. चांगला पंधरा ते अठरा तास प्रवास करावा लागतो. रिझर्व्हेशन असेल आणि ते पण कन्फर्म असेल तर कसलाच त्रास होत नाही. या प्रवासात अगदी मुबलक खायला, प्यायला मिळते. एकतर महाराष्ट्रची हद्द ओलांडली की सर्व गुजराती समोसे, फाफडा, असे सगळे खमंग पदार्थ मिळतात. प्रवास सुरू झाला आणि मी जरा मागच्या आठवणीत रमलो.
तशी पाहिली तर माझी ही गिरनारची चौथी वारी होती. पण उत्सुकता अगदी पहिल्या प्रमाणेच होती. या दत्त क्षेत्राची ओढच अशी आहे की, का कोणास ठाऊक आपण खेचलेच जातो. पहिल्या वेळी जे पाहिले, अनुभवले, जे दिसले, जी लोकं भेटली, बोलली हे सगळे सगळे वेगवेगळे असते. मी अनेक वर्षांपासून सिंहगडावर जातो आहे. जसा तो (सिंहगड) मला प्रत्येक वेळी वेगवेगळा भासला, दिसला आहे, अगदी तसेच गिरनार बाबत आहे. पहिल्या मातीचा सुगंध वाचता, पाहता येत नाही. तो फक्त आणि फक्त पहिल्या पावसात अनुभवता येतो. हे ही अगदी तसेच आहे. गुरूची सेवा, त्यांची भक्ती केल्या शिवाय आपल्यात चांगले बदल होत नाहीत.
जुनागड स्टेशन बाहेर आपल्या स्वागतासाठी अनेक रिक्षा असतात आम्ही सगळे सामान सुमान घेऊन स्टेशन बाहेर आलोच होतो.
" गिरनारी जावसेsss? कितनी सवरीss?"तोंडात भरलेल्या तोब्र्याने रिक्षावाले भाई( हो गजरात मध्ये सगळे भाई असतात) विचारता झाला.
आम्ही हलणाऱ्या टूलणाऱ्या रिक्षेच्या टपावर सामान टाकून एक विशेष चहा जूनगडच्या स्टेशन बाहेर मिळतो "भट्टी चहा" हा चहा प्रवासाचा ताण जरा कमी करतो आणि पुढील प्रवासासाठी तरतरी आणतो. म्हणून तो पिणे आवश्यक आहे. जुनागड ते गिरनार फक्त आठ ते दहा किलोमीटरचे अंतर जेमतेम रिक्षाने अर्ध्या तासात कापून गिरनार पायथा गाठता येतो.
गिरनारला जमिनीवर पाय ठेवलाकीच आपण कुठल्या तरी वेगळ्या जागी आलो आहोत याचा भास नक्की होतो. जर आपल्याला अध्यत्मिक गोडी, रुची असेल तर हे नक्की जाणवते. रिक्षेतून उतरलो की गिरनार पर्वत अगदी सहज नजरेस पडतो. पर्वत पाहताच कोणत्याही भक्ताचे हात आपोआप जोडल्या जातातच.
गिरनार पर्वत आपल्याला पायथ्यावरून जो दिसतो तो फक्त या मोठ्या शक्तीचा फक्त एक भाग आहे. कळस काठायला आधी कासवाचे दर्शन घ्यावे लागते, अगदी तसेच आहे. आपण कोणत्या वेळी कोणत्या वातावरणात गिरनारला जातोय यावर पायथ्यावरुन हा पर्वत दिसणे नदिसणे अवलंबून आहे.
गिरनार पायथ्याला अनेक मठ, हॉटेल आहेत जिथे आपली राहण्याची उत्तम सोय होते. आम्ही नेहमीच्या मठात बॅगा टाकल्या आणि आराम सुरू केला. खरतर परिक्रमा जेव्हा असते तेव्हा या सर्व परिसरात अगदी जत्रा भरते. जिकडे तिकडे माणसंच माणसं , नागा साधू, महंत, त्यांचे अनुयायी, सामान्य भक्त, सेवक अशांनी परिसर गजबजून जातो. पण मागील एक दोन वर्षात म्हणजे करोना काळात याला बंधने आले आहेत. शासन आणि स्थानिक प्रशासन यांचे अजून अनेक निर्बंध याहीवर्षी होते.
गिरनार परिक्रमा म्हणजे, संपूर्ण पर्वताला जंगलातून प्रदक्षिणा मारावी लागते. हे जंगल वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्यांचे नियम आणि शिस्त पाळून परिक्रमा करावे लागते. माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे पराकोटीची उत्सुकता मनात होतो. तसे पाहिले तर पूर्वी या परिक्रमेत काही लाख लोक येत होते. जागो जागी चहा, प्रसाद, वाटप करण्याची सेवा करत होते. तसेच काही लोक रात्री मुक्कम पण करत होते. अशी मान्यता आहे की या परिक्रमेत प्रत्यक्ष देव देखील दत्त गुरूंची सेवा करतात. हा ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा विषय आहे.
वनविभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या नियमानुसार बरोबर पहाटे चार वाजता परिक्रमा मार्गावर प्रवेश मिळणार असल्यामुळे आम्ही पहाटे तीन पासून गेट जवळ जाऊन उभे होतो. न जाणो गर्दी असेल तर आमचा नंबर लवकर लागावा हाच उद्देश. परिक्रमा मार्गासाठी आधी एक लहानशी लोकवस्ती लागते. चांगला डांबरी रस्ता आपल्याला जंगलाच्या पोटात घेऊन जातो. तसा रात्रीचा काळोख होताच, पण वस्तीतून रस्त्यावरील दिवे होते. आम्ही सर्व लोक आतल्या भागातील गेट जवळ उभे होतो कारण अजून वेळ व्हायची होती. खरतर परिक्रमा याही वर्षी होणार नव्हती पण संत,साधू, स्थानिक भक्त यांनी तहसीलदार,शासन यांना सर्व सहकार्य करून परिक्रमा घ्यावी अशी विनंती केली आणि महाराजांनी तहसीलदार तशी बुध्दी दिली. मी जसे म्हणलो की अनुभूती आली कीच शक्तीची ताकद समजते. कोणत्याही घटनेकडे आपण कसे पाहतो म्हणजे सकारात्मक किंवा का घडले? असा विचार केला की समजू लागते.
तर बरोबर चार वाजता जंगलातील वाटेवर प्रवेश मिळाला. तसा आत अंधार होताच पण सोबत विजेरी असल्यामुळे त्याचा प्रकाश अंधाराला काही अंतर कापत होता. वाटेत चार पाच लहान मोठे ओढे वाहतात. या परिक्रमा मार्गाची मला खूप गंमत वाटली. आधी सरळ सिमेंटचा अगदी घडाच्या घडा रस्ता ( रॅम्प), मग तसाच एकदम तीव्र उतार असलेला रस्ता( ९० अंश)...मग पाऊल वाट. या वाटेवर एक मंदिर आहे दत्त मंदिर,आश्रम आहे. आलेल्या सर्व भक्तांना कोणतीही मनात अभिलाषा न ठेवता नाश्ता, चहा पिवून पुढे जाण्यासाठी ताकद देणारे शब्द असे मिळतात.
"आवो बच्चाss" नागा साधूने मंदिराच्या बाहेरील बाजूला मला अडवले.
खरतर माझ्या सोबत अजून दोन जणं होते पण त्यांना ते काहीच म्हणाले नाहीत. मलाच का अडवले या विचारत असतानाच...
"कुच भी डाल...परंतु नोट ही डालना...खुला नही लुंगा, नहीं तो तुझेss जाने नाही दुंगाss" असे म्हणत त्यांनी आपले भिक्षा पात्र माझ्या समोर केले. हे पण ते हसत म्हणत होते.
मी आधीच त्यांच्या हातात सापडलो असे वाटत असताना त्यांचा हा आदेश आला. काय त्यांचे रूप होते!!! कोणाला पण त्यांची भीती वाटेल. जटा वाढलेल्या, पूर्ण अंग उघडे,शरीरावर कोणतेच वस्त्र नाही, सर्वांगाला भस्म लावलेले, त्यावर कपाळावर लाल रंगाचे मोठे नाम लावलेले, गळ्यात अनेक माळा, आणि...आणि...चक्क डाव्या हाताने तलवारीने आपले गुप्त अंग त्याला गुंडाळलेले, उजव्या हातात भिक्षा पात्र.
हे सगळे पाहून सामान्यपणे कोणतीही व्यक्ती एकतर घाबरेल किंवा त्याला किळस तरी वाटेल.पण या पैकी मला काहीही वाटले नाही. कदाचित माझे पूर्व संचित आणि काही पूर्व कर्म असेल म्हणून तिघात फक्त मलाच आडवले. मी शांतपणे पाकिटात हात घातला आणि एक नोट बाहेर काढून त्यांच्या भिक्षा पत्रात टाकली
"जय होsss बाबा गिरनारी सुखी रखेss" माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी आशीर्वाद दिला आणि माझ्या कपाळी भास्माचा टिळा लावला.
गेली अनेक वर्षे श्री गुरुचरित्र पारायण होत आहेत. त्यात पण अध्याय आहे ज्यात एका स्त्रीला मागील जन्मातील धनको पैशासाठी त्रास देत असतो. पण त्या अबला स्त्रीची सुटका महाराज करतात. मी पण माझ्या बाबतीत हाच विचार केला. कदाचित मला मागील कोणत्याही ऋणातून मुक्त करायचे असेल. हा विचार डोक्यात आला आणि मी मार्गस्थ झालो.
गिरनार परिक्रमा हा एक विलक्षण अनुभव आहे. वाट पण साधी सरळ नाही. आधी सांगितले तसे रस्ता पार करून एक भले मोठे दगडा दगडातील खडे आणि नागमोडी असे चढण लागले. हा रस्ता बरोबर गुरुशिखराच्या मागच्या बाजूला आहे मग ही वाट सोपी कशी असेल. वाट चढून वर आलो की वन विभागाची चेक पोस्ट आहे. हे चढण पार करून वर येताच अजून खोल खोल नेणाऱ्या सिमेंटच्या बांधिव बऱ्याच पायऱ्या लागतात. म्हणतात न आपल्याला आयुष्यात चढ आणि उतार, चांगले आणि वाईट दिवस अशा सगळ्यांना तोंड द्यावे लागते. तसेच काहीसे या परिक्रमेत जाणवत होते. संपूर्ण वाटा या अशाच आहेत.
परिक्रमा मार्ग जवळ जवळ ३८-४० किलो मिटरचा आहे. वाटेत मठात प्रसाद मिळतो.तोच आपल्याला वाटचालीत आधार देतो. बाकी आपल्या सोबत काही खाद्य असेल तर उत्तम. पूर्ण परिक्रमा करायला साधरण चालीने कमीत कमी चौदा पंधरा तास तरी लागतात. पण जर खूप गर्दी असेल तर मग कितीही वेळ लागू शकतो. त्यामुळे आपला वेळ आणि दिवस राखून यावे हे उत्तम आहे.
गिरनार हे प्रामुख्याने श्री दत्तक्षेत्र आहे. तसे पाहिले तर श्रीदत्तक्षेत्र फक्त तीनच आहेत. जे प्रत्यक्ष त्यांनी निर्माण केलेली आहे. माहूर, गिरनार आणि पांचाळेश्वर. यापैकी गिरनार यावर दत्तप्रभुंचे वास्तव्य असल्यामुळे अनेक योगी, तपी, मुनी, महंत हे आपली साधना करतात. खरतर गिरनार हे हिंदू, जैन, मुसलमान अशा वेगवेगळ्या संस्कृतीचे संगम आहे. गिरनारची उंची साधारण ३६०० फूट पेक्षा उंच आहे. यात एकूण एकवीस शिखरे आहेत. तसे पाहिले तर पाच शिखरे मुख्य मंदिरे आहेत. जसे नेमिनाथ, अंबामाता,गोरख (गोरखनाथ), गुरुशिखर आणि कालिकामाता. नेमिनाथ हे जैनांचे क्षेत्र आहे. अंबामाता शिखर येथे अंबाजी देवीचे मंदिर आहे. एकावन्न शक्तीपिठामधील हे एक पीठ आहे. गोरख शिखर येथे गोरक्षनाथ यांनी तपस्या केली होती. ' दत्त प्रबोध ' या अनंतसुत विठ्ठल यांच्या ग्रंथात त्यांनी गिरनारचे महात्म्य सांगितलेले आहे.
गिरनारला एकूण दगडी दहा हजार पायऱ्या आहेत. हा फक्त एक आकडा आहे. 'ते' (महराज) आपोआप पार करायला आपल्याला बळ आणि शक्ती तर देतातच आणि आपला अहंकर देखील कमी करतात. मी काही मोठा अधिकारी व्यक्ती नाही पण माझा अनुभव हाच आहे कि गिरनारला नेहमी नेहमी का जावे किंवा ' ते ' का घेऊन जातात याचे मला सापडलेले किंवा त्यांनी समजून दिलेलं एकमेव कारण म्हणजे आपला मी पणा, अंहकार हे असेल वाईट दोष गळून पडावेत आणि सेवा, समर्पण, अनुभूती आपल्या अंगात यावी याचसाठी आपल्याला बोलावतात असे वाटते.
गिरनार दिवसा चढणे जरा कठीण आहे. एकतर उन, त्यात चढण यामुळे हैराण व्हायला होते. असे असून देखील अनेक लोक दिवसा पण गिरनार चढतात. आम्ही आपले नेहमी रात्रीच चढणे सोईचे मानतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला गिरुशिखरावरील मंदिर होय, श्री गुरुदेवदत्त यांच्या जेथे पादुका आहेत त्या डोंगराला गुरुशिखर म्हणतात. यावरील मंदिर पौर्णिमेला रात्रंदिवस दर्शनासाठी सुरू असते. इतर वेळी रात्री दहा ते पहाटे सहा यावेळी मंदिर सगळ्यांसाठी बंद असते.
मगाशी म्हंटल्या प्रमाणे, रात्री आम्ही निघालो. गिरनार पर्वत आणि पायऱ्या जिथून सुरू होतात.तिथे एक कमान आहे.
ज्यावर गुजराती मध्ये लिहलेले आहे. ही कमान ओलांडून आत गेलो की आपल्या डाव्या हातात एक मारुती मंदिर लागते. याच मारुतीला नारळ वाढवून पुढे जाण्याची प्रथा आहे. कदाचित मारुतीराया कडून बळ मिळावे आणि या पायऱ्या चढून जाता याव्यात हीच प्रेरणा यातून मिळावी म्हणून ही प्रथा सुरू झाली असेल.
गिरनार पर्वतावर जायला दगडी बांधीव अशा पायऱ्या आहेत. साधारण आठ ते दहा इंच असतील. पण आपल्याला जेव्हा पायऱ्या चढून वर जायचे असते त्यावेळी पहिल्या पायरीची आपल्या आपल्या शक्ती प्रमाणे पूजा करावी. त्याचे कारण असे की वर जाताना समर्पण भाव आणि एकच मागणे करावे " मला वर घेऊन चला, मी आपला आहे, तुम्ही मला मार्ग दाखवणार आणि मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन समर्पण करत आहे." हे असे मागणे मागून पहिल्या पायरीला डोके टेकवून नमस्कार केला की पुढील वाट सुखकारक होते. तसे अजून एक आवश्यक आधार म्हणजे काठी किंवा दंड सोबत असेल तर अजून उत्तम होते.
सगळे जणांनी चढायला सुरुवात केलीच. रात्री चढताना आपल्याला विजेरी आणि अधून मधून दिसणारे विजेचे दिवे त्यात जर पौर्णिमा असेल तर चंद्राचा प्रकाश एवढे सगळे असेल तर चढताना खूप उपयोग होतो. हा चंद्राचा प्रकाश आपल्याला वाटेत नक्कीच साह्यभूत होतो. मजल दर मजल करत नेमिनाथ मंदिर आले. खर तर गिरनार पर्वत जसा भक्तीचा आहे तसाच तो मानसिक शक्तीचा पण आहे असे मला वाटते. एकदा आपण त्यांना शरण गेलो आणि पुढील वाट सुखकारकपणे पार करून सेवा करून घ्या हे मागणे केले की नकारात्मक विचार मनात न आणता मार्गक्रमण करत राहावे लागते. सुरवातीच्या हजार दोन हजार पायऱ्या आपली मानसिकता तपासणाऱ्या आहेत.
"बस आता मला नेमीनाथ मंदिर काठायचे आहे" असाच विचार करत पायऱ्या चढल्या की आपल्यात काय बदल आणि फरक पडतो हे प्रत्यक्ष अनुभव घेतानाच समजेत. या पहिल्या पायऱ्या फक्त आपला निग्रह आणि मानसिकता तपासून घेतात. हळू हळू आपला मी पणा गळून पडायला लागतो आणि शरीर पुढील वाटचालीसाठी हलके वाटायला लागते.
"काय मस्त वाऱ्याची झुळूक आले रे" मी मामाला म्हणलो.
"हो रे, खूप वेळानी आले वारे" मामा पण घाम पुसत म्हणाला.
आम्ही दोघे पण घामाने चिंब भिजलो होतो. कारण या पहिल्या तीन हजार पायऱ्या चढताना दम तर लागतोच आणि डोंगराचा खालील भाग असल्यामुळे वारा पण नसतो. म्हणून जरा दमछाक होते. पण आपल्या डोक्यात हे पक्क हवं की या नेमीनाथ मंदिरा पर्यंत काही झाले तरी "मला जायचेच आहे" ही मानसिक शक्ती अवश्य उपयोगी पडते.
या सुरवातीला खूप दम लागतो कारण अचानक शरीराची खूप जलद गतीने हालचाल सुरू होते. आपण नेहमी जर नियमित जिना चढ उतार करत असू तर मग जरा सवय असते. पण अचानक इतकी हालचाल, वाहणारा घाम आणि वारा नसणे हे आपल्याला जरा भीती आणि नकारात्मक विचार मनात आणून बसवतात...पण मन पुढे जाऊ असे म्हणते. अशा वेळी बुध्दी आणि भक्तीने विचार करून पुढे चालत राहिले की काम अतिशय सोपे होते. असा माझा नेहमीचा अनुभव आहे. याही वेळी तोच विचार डोक्यात नक्की केला होता. " बस मला तीन हजार पायऱ्या चढून नेमीनाथ मंदिर गाठायचे आहे."
नेमीनाथ मंदिराला डाव्या हाताने वळसा घालून आपण परत पायऱ्या चढायला लागतो. वाटेत एक दोन मंदिरे, मठ लागतात पण यात एक गंमत आहे. वाटेवर एक गोमुख धाम लागते. इतक्या उंचीवर तरी साधरण चार एक पायऱ्या चढून गेल्यावर हा धाम आहे. येथे एका मोठ्या कुंडात( हौद) सतत पाणी पडत राहते. हे पाणी अगदी स्वच्छ, नितळ आणि चवीला गोड आहे.

"आssओss,पानी पिओss" असे अग्रहानी आपल्याला तेथील सेवेकरी सांगत असतात. हे पाणी बारमाही असते. पौर्णिमेला इथे श्रद्धाळू गरमगरम प्रसाद पण वाटप करतात आणि तेही कोणताही मोबदला न घेता!! फक्त सेवा आणि समर्पण बाकी काही नाही....
मुळात गिरनार हेच आपल्यात सेवा भाव निर्माण करणारे आणि असलेला सेवा भाव वाढविणारे असे क्षेत्र आहे. गोमुख धाम मधील ताजे, गार पाणी पिल्यावर आपल्याला एकदम तरतरी येते. त्यामुळे येथील पाणी आणि असेल तर प्रसाद अवश्य घ्यावा. असेच गोमुख धाम डाव्या बाजूला ठेऊन पायऱ्यांनी वर चढले की आपण आता 'अंबाजी माता' शिखरावर येतो. तसे पाहिले तर आता इथपर्यंत यायला रोपवे ची सोय झाली आहे. पण हा रोपवे सकाळी सातला सुरू होतो. अंबाजी माता येथे प्रचंड वारा आणि गारवा आपल्याला जाणवतो. अतिशय सुरेख मंदिर आहे. पण आपण रात्री जर येथे आलो तर ते बंद असते. त्यामुळे आपल्याला याचे दर्शन परतीच्या प्रवासात घ्यावे लागते. उत्तम आणि प्रशस्त असे हे मंदिर आहे. आत गाभाऱ्यात माहूरच्या देवी सारखेच देवीचे रूप आहे. अनेक महिला आवर्जून देवीची ओटी भरतात.
मंदिराच्या मागे काही हॉटेल, टपऱ्या, आहेत जिथे रात्री पण चहा किंवा काहीतरी खायला मिळते पौर्णिमा असेल तर, इतर दिवशी मिळेलच असे नाही. मंदिर मागे ठेऊन आपण असेच पुढे गेलो की आपल्या डाव्या हाताला दोन पर्वत शिखर दिसतात. पहिले उंच शिखर म्हणजे 'गोरख' आणि त्यांच्या मागे पण उंचीने जरा लहान शिखर म्हणजे 'गुरू शिखर' हे गिरुशिखर दुरून जरी दिसले तरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात. ज्यासाठी एवढे कष्ट घेतले ते आता आपल्या समोर असते म्हणून समाधान वाटते.


तसेच दोन डोंगर एका दगडच्या पुलाने जोडलेला आहे. रात्री हे दिसत नाही पण जेव्हा उजेडते तेव्हा आपण कोणत्या मार्गाने आलो हे पाहून मन धक्क होते. हा पूल ओलांडून वर आलो की गोरखनाथ मंदिर, धूनी मठ, आणि एक पिर पण आहे.आता या वास्तूंचा कायापालट झाला आहे. मला जेव्हा पहिल्यांदा जायला मिळाले होय इथे आपण जातच नसतो. तेच घेऊन येतात याच पोटी असे शब्द लिहले जातात. तर सांगत होतो की तेव्हा आधार म्हणून घेतलेल्या काठीचा पण काही उपयोग होत नव्हता. असे प्रचंड वारे त्यावेळी होते. एकतर हे शिखर चारी बाजूंनी मोकळे आहे. त्यामुळे वारा मुक्त पणे वाहत असतो. मनात आपण कल्पना करा आत्ताच हे असे वार आणि थंडी आहे. मग जेव्हा गोरखनाथ यांनी येथे साधना केली असेल तेव्हा काय परिस्थिती असेल!!!
येथे एक धुनी धाम आहे. या धुनी धाम मधून अवश्य धुनी(अंगारा) घ्यावा आणि पुढे आता मात्र पहिल्यांदा आपल्याला पायऱ्या उतराव्या लागतात.पायऱ्या पण खूप आखीव रेखीव आणि बांधीव आहेत. दोन्ही बाजूला दगडी कठडे आहेत. ते पण एकदम मजबूत. मी आणि मामा आता एक एक पायरी उतरत उतरत खाली आलो. आयुष्यात कायम कोणती वाट निवडावी असे अनेक प्रसंग येत असतात. काहींना कमी, काहींना अनेक असे प्रसंग येतात. येथे पण असे दोन रस्ते येतात. दोन्ही रस्त्यांची कमान समान आहे. डावीकडचा रस्ता गुरू शिखरचे दर्शन घडवतो आणि उजवीकडील खाली जाणारा रस्ता आपल्याला धुनी धाम कडे नेतो.

आम्ही ज्याप्रमाणे अगदी पहिल्या पायरीला डोके टेकवून नमस्कार केला तसाच नमस्कार या गुरू शिखर पायरीवर केला.
"हेच ते हेच शेवटचे चढण" असे भाव मनात होते. बरेचदा कार्य संपत आले कीच आपण अधीर होतो तसेच काहीसे या सर्व शेवटच्या पायऱ्या पाहून आपले होते. त्याच जोशात आपण या सर्व पायऱ्या चढून वर येतो.
"काय मस्त वारा आला रे"मामा म्हणाला
या वाटेवर एक अतिशय मोक्याच्या ठिकाणी एक खिडकी आहे. ही खिडकी एका क्षणात आपली मरगळ, थकवा असा काही गायब करते, की लागलेला दम हे काही काही जाणवत नाही. मामाच्या वाक्याने मला पण तो वारा मनाला आनंद देऊन गेला.
आता मुख्य गुरुशिखराच्या काहीच पायऱ्या शिल्लक राहिल्या होत्या पण मनाची गुरू पादुका पाहण्याची ओढ इतकी होती की त्या पायऱ्या पण लवकर चढून वर जावे असे वाटत होते. पण पौर्णिमा असल्यामुळे जरा लोक जास्त होते.म्हणून चक्क रांगेत लोक डाव्याबाजूला उभे होते. आम्हीपण रांगेत उभे राहिलो.
"जय गिरनारीss, जय गिरनारीss"असा उद्घोष करत मंदिरात प्रवेश केला. हात जोडून श्लोक म्हणत
"काषायवस्त्रं करदंड धारिणं |कमंडलुं पद्मकरेण शंखम् | चक्रं गदाभूषितभूषाणाढ्यं | श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||"
मनोभावे सगुण पादुकांचे दर्शन घेतले. पादुकांच्या मागे अतिशय सुंदर आणि हसरा चेहरा असणारी संगमरवरी श्री गुरुदेव दत्त मूर्ती आहे. ज्यावर आता अतिशय नाजूक आणि कलाकुसर असलेली सोन्याची प्रभावळ (कमान) लावलेली आहे. हे सगळे रूप आणि पादुका डोळ्यात साठवून प्रदिक्षणा पूर्ण करून लगेच खाली उतरावे लागले. जागेअभावी अगदी कमी वेळेत आपल्याला मंदिराच्या बाहेर पडावे लागते. त्यावेळी आपण जे कष्ट घेतले त्याचे फलित मिळाले असेच वाटत असते.

दर्शन घेऊन आम्ही कमंडलु तीर्थ किंवा धुनी कडे जायला निघालो. वरती लिहले त्याप्रमाणे ज्या दोन कमान लागल्या त्यातील आता दुसऱ्या कमानी मधून खालील पायऱ्या उतरून गेलो की हा धुनी मठ लागतो. या साधारण पाचशे पायऱ्या असतील. खाली मठात प्रत्यक्ष दत्त महाराज यांनी साधनेच्या वेळी प्रज्वलित केलेली धुनी आहे. दर सोमवारी यातील भस्म बाहेर काढून भक्तांना लावण्यासाठी ठेवलेलं असते. या धुनी मठात महाराजांची अनेक आयुधे आहेत. पण ती आतील गर्भगृहात आहेत. मठात किती ही आणि केव्हाही भक्त आले तरी त्यांना पोटभर प्रसाद मिळतो. हा प्रसाद घेणे आवश्यक आहे. त्याची दोन कारणे. एक म्हणजे हा श्री दत्त महाराज यांचा आशीर्वाद आणि दुसरे म्हणजे ज्या पायऱ्या चढून आपण आलो त्या आता उतरून जाण्यासाठी ताकद मिळण्यासाठी हा प्रसाद अवश्य सेवन करावा.
माझा अनेक वेळी जाण्याचा हाच अनुभव आहे की हा प्रसाद तुम्हाला खूप खूप समधान आणि ताकद देऊन जातो. अनेक भक्त आपल्या शक्ती नुसार येथे दान करतात. तेथील कोणतेच सेवेकरी त्याला पैसे समजत नाहीत किंवा ते सेवेकरी पैसे हातात देखील घेत नाहीत. त्यांच्या साठी ते फक्त एक कागद आहेत. मी याबाबत काही अनुभव घेतलेले आहेत.
धुनी माठातून आपण परतीचा प्रवास सुरू करतो. त्यावेळी सकाळ झालेली असते.सगळे कडे पर्वत, पायऱ्या, ढग असे दिसत असते आणि सकाळचा आल्हाददायक वारा आपल्याला एकदम ताजं करत असतो. रात्री अंधारात जे पाहता आले नाही ते सगळे आता स्पष्ट दिसत असते. तेव्हा समजते की आपण काय दिव्य आणि किती वर चढून वर आलो आहोत.
जसे वर चढणे कठीण तसेच उतरणे पण कठीण आहे. आपल्याला उतरताना घुडग्यांवर खूप ताण आणि दाब पडतो. पण जर नीकॅप असेल तर त्याचा फायदा होतो. पण मी यावेळी मुद्दम त्या घेतल्या नव्हत्या. म्हणून एकदम सावकाश सावकाश खाली येत होतो.
"झाले बाबाss एकदाचे" शेवटची पायरी उतरत मनात म्हणालो. शेवटची पायरी उतरून खाली आलो आणि डोके टेकवून फक्त एकच मागणे केले.
"महाराज अशीच सेवा नित्य घडो, परत लवकर नक्की बोलवा"
गिरनार हे खरचं एक अतिशय मनोहर ठिकाण आहे. आता सोय झाल्यामुळे किमान रोपवे ने वर जाऊन गुरुशिखराचे दर्शन घेणे सोईचे झाले आहे. अबाल आणि वृद्ध यांना जर खाली उतरून जाणे शक्य नसेल तरी किमान दुरून गुरूशिखर दर्शन घेता येईल. पण जर खाली जाता आले तर अवश्य जावे. मनात जायचे आले तर लगेच निर्णय घेतला तर पुढील सर्व अडचणी आणि मार्ग 'ते' सुकर करतात हा अनुभूतीने आलेला विचार आहे.
शेवटी एकच सगतो. "जय गिरनारी,बाकी आपण काही नाही"
"जय गिरनारी"
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०