Wednesday, May 19, 2021

"शनिवार पेठ"

 "शनिवार पेठ" 

    मच्या हॉस्टेलचा एक नियम होता....आम्हाला फक्त दोन वर्षच हॉस्टेलमध्ये राहता येत होतं. तिसऱ्या वर्षी आपला मुक्कम  हॉस्टेल मधून हलवावे लागतं होता. त्यामुळे दोन वर्षांनी हॉस्टेलचा अध्याय संपला !!!!!  आणि दुसऱ्या रूमचा शोध सुरू झाला.

     पुण्यात एखादी खोली भाड्याने मिळणे अवघड नव्हते...पण त्यासाठी ओळख लागायची. (म्हणजे ओळख असेल तर खोली मिळणे सोपे व्हायचे). एका सिनिअर मित्राच्या ओळखीमुळे आम्हाला एक जागा मिळाली...तीही शनिवार पेठेत!!!!! जुन्या पुण्यातील पेठ भागात प्रवेश मिळणे ( भाड्याने) म्हणजे एखाद्याने एकही प्रश्न न विचारता दार उघडण्यासारखे होते. (आता काही बदल झाले असतील......अशी उगाच माझी अपेक्षा). अर्थात, घरमालकाने आम्हाला त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय खोलीची किल्ली दिली नव्हती. 

   आमची खोली म्हणजे एका मोठ्या वाड्याचा एक छोटा हिस्सा होता, खोलीची साइज साधारणतः १४*१२  व एकाचे भाडे ४०० रूपये! हा वाडा पिढ्यानपिढ्या चालत आलेला, त्याचे बांधकाम ही खूप जुने होते. वाडा तसा दोन मजली आणि मोठा होता. खाली ६-७ खोल्या आणि वरती पण २ मोठे हॉल आणि ५-६ खोल्या. जुन्या पद्धतीचे माळवदाचे बांधकाम केलेले होते. (माळवद म्हणजे छतासाठी ऊभे,आडवे लाकडाचे मोठे मोठे ओंडके वापरून त्याच्यावर माती, शेण,आणि इतर काही वस्तू एकत्र करून घालतात).

     वाड्यातील वरील मजल्यावर असलेल्या हॉलला मध्येच खड्डा होता (जो हॉल ची फरशी खचल्यामुळे तयार झाला होता), तो रात्री लक्षात ठेऊन चुकवावा लागे. हा वाडा एखाद्या जीर्ण जख्ख म्हाताऱ्या सारखाच होता. त्यातील अनेक बिऱ्हाडं पण तसेच होते. 

    आमच्या त्या खोलीत एक मोडका कॉट (ज्याला बसून बसून मध्येच बाक ही आलेला), एक खाली जमिनीवर गादी आणि  फडताळे (भिंतीतले कपाट) एवढ्याच गोष्टी होत्या. त्या छोट्या खोली मध्ये आम्ही दोन मित्रांनी आपले हात लांबवले की दोन्ही भिंतींना हात लागत असत. ती खोली मला नेहमी वीर सावरकर यांच्या खोलीची आठवण करून देत असे.

    आमच्या या खोलीला लागून अजुन एक तशीच खोली होती. आम्ही त्या खोल्यानां जुळ्या खोल्या म्हणायचो.   त्यापैकी एका खोलीमध्ये माझा एक मित्र आणि मी रहायला आलो. पहिल्या खोलीत आम्ही राहायचो आणि पुढच्या खोलीत घरमालक कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे क्लास घ्यायचे. आमचे घरमालक डोक्याने खूप हुशार होते,  पण स्वभाव चिडका! कायम तोंडात मसाला तंबाखू, त्यामुळे बोलताना तोंडाचा वास यायचा. खर्जात पण हळू आवाज, लालसर गोरा चेहरा, घारे मोठे डोळे आणि कायम हाताची घडी घालून बोलायचे. समोर खिसे असलेली सेमी बेलबाॅटमची पँट, आकाशी वा निळा अर्ध्या बाह्यांचा इन केलेला शर्ट अशा वेशात ते कायम असतं. ते क्लास घ्यायला आमच्या खोलीतून  त्यांच्या खोलीमध्ये जायचे आणि रूम मध्ये फुल बाहीच्या बनियन वर मुला मुलींना शिकवायचे. 

    पहिल्या वेळी हे खूप विचित्र वाटले होते. आमच्या खोलीतून मुलं,मुली दुसऱ्या खोलीत क्लासला जायचे. हे म्हणजे  रेल्वेचा एक डब्बा ओलांडून दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासारखेच होते. नंतर आम्ही याला सरावलो आणि क्लासच्या आधी सावरून, आवरून बसायला लागलो.  त्या दुसऱ्या खोलीत रेल्वे सारखीच खडखड चालत असे, ती खडखड रात्री वाढायची. काही दिवस सहन केल्यावर मात्र त्याचा छडा लावायचा असे ठरवले. एक दिवस रात्री आम्ही झोपलो होतो, सरांच्या खोलीतून आवाज यायला सुरूवात झाली....म्हणून आम्ही त्यांच्या खोलीचे दार उघडून अंधारातच त्या खोलीत प्रवेश केला. खोलीतील लाईटचे बटन काही केल्या  सापडतं नव्हते...एकदाचे कसे बसे सापडले...आणि लाईट सुरू करून आम्ही आवाजाच्या दिशेने पुढे सरकलो...आवाज एका जुन्या ऑईलच्या काळ्या कॅन मधून येत होता. हळूच त्याचे झाकण उघडले...तर काय?????..... त्यात पाणी.....आणि दोन कासवं !!!!

                                 

     जे आरामात पाण्यात पोहत होते, त्यांची पाठ त्या ऑईल कॅनला बडवत होती. ...म्हणून तो खडखडाट सुरू होता. एकूण एका सस्पेन्स चा पर्दाफाश करण्यात आमच्या काही रात्रीची झोप गेली होती. त्यांच्याकडे पोपट होताच, मांजरी ते रूम वर आले की यायच्याच...आणि आता हे कासवं....असे हे त्यांचे प्राणी संग्रहालय होते. नशीब आमची गणती त्यांनी प्राण्यात केली नाही.

                                                                                                                                                                        

    माझ्या कॉटच्या वर एक जुनी लाकडी ३*३ची खिडकी होती. त्या खिडकीची दारं विशिष्ट पद्धतीत मिटले की त्या खिडकी मधून मस्त गार वाऱ्याची झुळूक येत असे, ती तशी झुळूक आल्हाददायक होती कारण रूम मध्ये पंखा नव्हता. उन्हाळ्यात फार गरम व्हायचे.                                                     

    खरंतरं या वाड्यात आम्ही दोन ते अडीच वर्षे कसे राहू शकलो हे आश्चर्यच आहे. रात्री हा वाडा एकदम भयपटाचीच आठवण करून द्यायचा. त्यात बाथरूम - संडास ला जाणे हे तर दिव्य होते.....तिथे जायला १०- १२ पायऱ्या उतरून खाली जावे लागत होते. रात्री खाली जाताना कधी समोरून घुस, मोठाले उंदीर जायचे.  अंगणात एक बारीक बल्ब, तसाच एक खाली बाथरूम - संडासात बारीक बल्ब असे.

    वाड्याच्या मागील अंगणात मध्यभागी सोनचाफ्याचे झाड व त्यावर मालकांनी बांधलेल्या शिड्या नेहमी साप शिडी सारख्या वाटत असतं. ते या शिड्यांचा वापर करून सोनचाफ्याची फुले तोडून विकत होते. वाड्यात अनेकांची बिऱ्हाडं होती आणि काही आमच्या सारखी मुले देखील! किती लोक...किती विविध त्यांचे स्वभाव, किती वेगळे त्यांचे जगणे आणि व्यथा ही ... पण तरीही ही सगळी मंडळी एकत्र राहत होती.

    एक उत्तम पेटी वादक होते, त्यांनी आपल्या उभरतीच्या काळात अनेक दिग्गज गायकांना साथ केली होती. पुणे आकाशवाणी वर अनेक कार्यक्रम केले होते. पण आता उत्तर आयुष्य असह्य शारीरिक व्याधी व आर्थिक अडचणीतून जात होते. 

    त्या विरूद्ध एक काकू होत्या त्यांच्यासाठी आयुष्य मजेत जात होते. त्यांच्याकडे  रेल्वेचा फुकट पास होता त्यामुळे त्या फक्त  २- ३ महिनेच खोलीत राहायच्या बाकी फक्त प्रवास करायच्या. त्यांना मी दोन वर्षात फारच कमी वेळा वाड्यात पाहिले व बोललो आहे. त्यांना कोणतेही शहर वा राज्य विचारले की त्या म्हणायच्या "किमान २-३ वेळा जाऊन आले मी." 

हे दोन चित्र पाहून मला त्याही वेळा खूप वाईट वाटे...खरंच आयुष्य किती वेगवेगळं असतं...?

    एकजण पैसे आहेत म्हणून उपभोगत होत्या आणि दुसरा नाही म्हणून अन्नान्नदशेत! खूप भयानक परिस्थिती होती..... त्या उत्तम कलाकाराला उत्तर आयुष्य कसे जगावे या प्रश्न होता, तर काकूंना आयुष्यात काहीच उरले नाही म्हणून मज्जा करण्यात समाधान वाटायचे.

    या वाड्यात मला एक गोष्ट नक्की उमजली ती म्हणजे आपल्या गरजा कमी असाव्यात. आपण सगळीकडे प्राप्त परिस्थितीत स्वतःला सावरून घेतले की जगणे सोपे आणि आशावादी होते.

                        Shaniwar peth police chouwki

    "कुठपर्यंत आलात तुम्ही? अच्छा अच्छा, पोलिस चौकी पर्यंत! बरं बरं......आता आधी डावीकडे वळा....मग उजवीकडे......मग आधी मोठा रस्ता.....मग....लहान गल्ली.....मग त्या गल्लीत उजव्या  हाताला जमिनीवर नळाचे १०-१२ पाईप दिसले, की त्याला सोबत करत तसेच पुढे पुढे या.....मग एक बोळ लागेल.....आणि जिथे नळाचे पाईप आणि बोळ संपेल तेथेच डाव्या हाताला निळ्या रंगाची भिंत असणारा वाडा.... तिथेच आम्ही राहतो....!"

    असा रूमचा पत्ता मी अनेक जणांना सांगत होतो. कारण सुरवातीला आम्हाला घर नंबर माहीत नव्हता.जसा जसा वाड्याचा आणि तेथील माणसांचा परिचय झाला तेव्हा बऱ्याच गोष्टी समजल्या.

    सुरुवातीला ही खोली आम्ही फक्त गरज म्हणून घेतली होती. आपण पुढे मागे ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ असा विचार केला होता. पण तसे करणे शक्य झाले नाही...आणि येथेच रहायला लागलो!!! थोड्या दिवसांनी नित्यक्रम मार्गी लागले... कॉलेज...मेस...क्लास....शाखा... आणि झोपायला खोलीवर!एकदा रूटीन बसलं की आपण पटकन सेट होतो.

    आम्ही खोली भाडे तत्वावर घेताना  आमचा असा समज होता की आम्ही आख्खी खोली भाड्याने घेतली आहे. त्यामुळे त्यात दोन काय आणि  चार काय? सगळ्यांना खोलीत सामावून घेऊ शकतो. याच विचाराने माझे आणखीन दोन मित्र आमच्या रूम वर काही दिवसांसाठी रहायला आले. 

    मालक स्वतः त्या वाड्यात राहत नव्हते. तसेही ते फक्त सकाळी व संध्याकाळी वाड्यात फेरी मारायचे (त्यांचा क्लास आमच्या खोलीच्या बाजूलाच असायचा) ; इतर वेळी व रात्री कधीही ते वाड्यात येत नव्हते. त्यांच्या या सवयीचा आम्ही बरेच दिवस फायदा घेतला. 

    पण एक दिवस अचानक रात्री ते वाड्यात फेर फटका मारायला आले. तेव्हा आमच्या त्या छोट्या रूम मध्ये आम्ही ७ ते ८ जणं गप्पा मारत बसलो होतो. आम्ही त्यावेळी सगळे जण वाड्यातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायचो. पण त्यांच्या समोर इतके सगळे एकत्र आल्यामुळे ते जरा सावध होऊन आम्हाला विचारत होते....."तू कोण?...तू कोण....?" त्यांना बऱ्याच जणांचे चेहरे माहित नसल्यामुळे आमचे २ पाहुणे मित्र बरोबर त्यात लपून गेले आणि त्यांना काहीच समजले नाही. याचे अजून एक  कारण म्हणजे आम्ही कधीच एकत्र जाऊन त्यांना भाडे देत नव्हतो. प्रत्येक वेळी एकच जण जाऊन पैसे देऊन येत होता, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे त्यांच्या लक्षात नव्हते. 

    पण त्या दिवसानंतर त्यांना काहीतरी शंका आली हे नक्की!!! वाड्यातील काही छुपे माहितगार त्यांना आमच्याविषयी माहिती पुरवत असावेत हे निःसंशय! अन्यथा कोणता माणूस इतका मोठा वाडा असाच लक्ष न देता भाड्याने देईल? मालक जरी चाणाक्ष होते,बारीक लक्ष ठेऊन होते. तरी आम्ही काही त्यांच्या हाती लागत नव्हतो. आम्ही शेंड्या लावण्यात तरबेज झालो होतो.

    माझा रोज सकाळी क्लास असे, त्यामुळे मी पहाटेच रूम मधून बाहेर पडत होतो. त्यावेळी आम्ही ३ जणं रूम मध्ये राहायचो.....एका कॉट वर मी आणि खाली जमिनीवर दोन जणं! मी उठलो की खालचा एकजण कॉटवर येऊन तोंडावर पांघरूण घेऊन झोपत होता. हा असा गनिमी कावा अनेक दिवस सुरू होता.

                                     

    मालक नेहमी प्रमाणे सकाळी क्लास घ्यायला यायचे. तेव्हा कॉटवर मित्र झोपेच सोंग घेऊन पडत असे, ते वाड्यातून गेले की हा उठायचा.......असा नित्य कर्म सुरू होता. न राहवून शेवटी एक दिवस मालकांनी हळूच पांघरूण वर करून पाहिलेच.....पण नशीब त्यावेळी तो मित्र पोटावर झोपला होता, त्यामुळे त्याचा चेहरा त्यांना दिसला नाही.

    काॅट बेसिस वर पैसे देणारे चौघे....आणि त्याबदल्यात राहणारे सहा व सात जण असा गोतावळा असायचा. आमचे पाहुणे मित्र असे काही वाड्यात राहायचे जणू काही तेच अधिकृत भाडेकरू आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबत कधीच कोणाला शंका आली नाही आणि जागेसाठीची ही बनवा बनवी त्यावेळी यशस्वी झाली. 

    आमचे अनेक मित्र ' अशी ही बनवा बनवी ' करत आमच्या खोलीवर राहिले आहेत....! आणि तुम्हाला तर माहीतच आहे ....युद्धात आणि मैत्रीत......सारे काही क्षम्य असते!!!! 

    शनिवार पेठ ही खूप जुनी जाणती पेठ आहे. आमच्या वाड्यात जशा अनेक घटना घडल्या तशाच या पेठेत पण घडल्या आहेत. आमच्या रूम जवळ असलेला शनिवार वाडा, बाल गंधर्व, त्याला लागून असलेला पूल, ओंकारेश्वर मंदिर, कसबा गणपती या ठिकाणी आम्ही नित्य हिंडायचो. किती तरी रात्री आम्ही या बालगंधर्व आणि शनिवार वाडा येथील पुलांवर गप्पा मारत बसलो आहोत. दोन्ही पुलावर रात्री हात गाडीवर बदामशेक मिळते, खूप छान चव आहे त्याची, कधी शक्य झाले तर नक्की पिऊन पहा. या पेठेला खूप ऐतिहासिक महत्व आहेच आणि जुन्या पुण्यात या पेठेचा समावेश आधी होतो. 

     माझी पुण्यातील पहिल्या चित्रपट गृहाची ओळख म्हणजे डेक्कन टॉकीज ( आताचा R डेक्कन मॉल) आणि दुसरे टॉकीज म्हणजे प्रभात टॉकीज. शाखेतील मुलांना ' बाल शिवाजी ' हा उत्तम सिनेमा दाखवायला पहिल्यांदा मी प्रभात टॉकीज येथे घेऊन गेलो.  पण शनिवारात (हा टिपिकल गावातील लोकांचा बोली शब्द आहे) राहायला आलो आणि प्रभातच्या वाऱ्या च सुरु झाल्या. पुढे पुढे तर दर शनिवारी रात्री प्रभात आणि रविवारी सकाळी मंगला टॉकीज मध्ये मॉर्निंग शो असा प्रकार ही सुरू होता. तेव्हा तिकीटाचे दर फार कमी होते, त्यामुळे इथे पिक्चर पाहणे शक्य व्हायचे.

    एकदा असेच रात्री आम्ही  प्रभातला (हा पण टिपिकल गावातील लोकांचा बोली शब्द आहे) दादा कोंडके चा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यावेळी दादा कोंडके चे सगळे म्हणजे लागतील तितके सिनेमे आम्ही पाहिले असतील. तिकीट काढून आत जाऊन बसलो, तशी आत गर्दी कमीच होती. सिनेमा सुरू झाला...दादा कोंडके चे द्विभाषिक, राजकीय,सामाजिक कोट्या करणारे विनोद...लावण्या असे सगळे त्या सिनेमात होते...हे सिनेमे पाहताना डोक्याला कोणताच ताण येत नव्हता. मारामारी असली तरी ती विनोदी असते....निवांत मजा घेत सिनेमा पाहत होतो....एका लावणीला आमच्या पुढील ३-४ रांगेतील काही बायका/मुली  जागी उभ्या राहून नाचत होत्या...!!! 
    आमच्या एका मित्राला हे समोरील पडद्यावरील लावणीचे दृश्य आणि समोरील अंधारात पाठमोऱ्या नाचणाऱ्या मुली हे दोन्ही पाहून अचानक चेव सुटला. त्याच्या नकळत अंगठा आणि तर्जनी चा उत्तम उपयोग करून त्याने खणखाणीत शिट्टी वाजवली ( त्यावेळीं आमच्यात तोच अशी शिट्टी बजावण्यात एकदम तरबेज होता). लावणी नंतर मध्यंतर झाली, लाईट लागले आणि त्त्या बायकांनी मागे वळून पाहिले,आपल्याला कोणी शिट्टी वाजवली ते......!त्यांना पाहताच आम्हाला समजले की माझ्या मित्राने चुकीचा नंबर फिरवला आहे....! कारण ते सर्व  तृतीयपंथीय होते.......!आणि सिनेमाच्या तिकिटात डान्सची तालीम करायला आले होते.....!!!! आमची त्या रात्रभर हसून हसून पुरेवाट झाली... खूप दिवस या विषयावर आमची चिडवा चिडवी सुरू होती. खरंतर ही फक्त गमंत झाली पण असे अनेक विनोदी,दुःखाचे प्रसंग या शनिवार पेठेत घडले आहेत.

    आता आम्ही सगळे जण एकमेकांचे जिवाभावाचे मित्र झालो होतोच. वाड्यातील इतरांसाबोत पण चांगले सुत जुळले होते. त्यामुळे वाड्यात रात्री निवांत वेळ जात होता. मला तिथे रहायला आल्या पासून कधीही हॉस्टेलची आठवण येत नव्हती, कारण हॉस्टेल सारखेच वातावरण आता येथे पण झाले होते, फक्त यात स्वातंत्र्य अधिक मिळत होते.

    त्यावर्षीची धुळवड ही आमच्या कायम लक्षात राहील. आमच्या वाड्यातील इतर मित्र पौरोहित्य करत होते, त्यांनी पंचांग पाहून ,उद्या धुळवड आहे असे कळवले, मग काय सकाळी सकाळी लवकर उठलो आणि वाड्यात जोरदार धुळवड साजरी करणे सुरू झाली. पुण्यात अजून पण  रंगपंचमीला खेळण्याचे प्रमाण जास्त आहे. पण बाहेर गावावरून आलेल्या  मुलांना धुळवडचीच सवय आहे. आम्ही परभणीत धुळवडच खेळायचो. त्यामुळे सकाळी वाड्यात मनसोक्त रंग खेळून, दंगा मस्ती करून आम्ही "चला किमान चहा तरी पिऊन येऊ" म्हणून जवळच असलेल्या अमृततुल्य वर रंगवलेले तोंड,पाणी खेळून भिजलेले कपडे अशा प्रकारे रस्त्यावरून १२-१५ जणं जात होतो, रस्त्यावरील सगळे लोक आमच्या कडे कुतूहलाने पाहत होते,रस्त्यावरून कोणीच रंगलेले दिसत नव्हते. मनात शंका यायला लागली की खरंच आज धुळवड आहे ना? का फक्त आपणच तोंड रंगवून फिरतोय? नाहीतर आपलेच हसे व्हायचे ? पण नशीब चहा पिता पिता एक दोन आमच्याच सारखे दिसले आणि जीव भांड्यात पडला.

    असे अनेक किस्से खोलीच्या बाहेर घडायचे.  काही बरे.... काही वाईट..... कधी कोणाला खूप खेचायचं, त्रासही द्यायचा, वाद विवाद करायचे, कोणाला चिडवायचे, कोणाला गरज पडली की आर्थिक मदत करायची, मदतीसाठी धावून जायचे, असे छान नाते आमच्या सगळ्यात निर्माण झाले होते आणि अजून पण आहेच. एक गोष्ट आम्ही नेहमीच टाळली ती म्हणजे.......कोणाचीही जीवघेणी चेष्टा कधीही केली नाही!!! आम्ही  फार साधे, निर्मळ मित्र होतो, त्यावेळी कोणाला काही चिडवले, रागावले, चुकुन चुकीचे बोललो....तरी कोणालाच राग येत नव्हता. आपल्या प्रत्येकात सुप्त स्वाभिमान, अहंकार असतोच पण तो कोणा मध्येच जागा झालेला नव्हता. कदाचित त्या वास्तूतील लोकांकडे, त्या जागेकडे पाहून तो जागाच होत नव्हता. फक्त प्राप्त परिस्थितीत जगणे आणि सगळ्यांना सामावून घेणे हेच ती जागा शिकवत असेल.

    शनिवार वाडा, बालगंधर्व रंगमंदिरात, पूल, शनिवार वाडा, अण्णा चे पोहे,( हे नक्की ट्राय करा),कसबा गणपती अशा अनेक ठिकाणी नित्य फिरणं, जाणं व्हायचे. उन्हाळ्यात खोलीत पंखा नसल्यामुळे खूप गरम व्हायचे मग काय करायचं सरळ बालगंधर्वचा पूल गाठायचा........! त्यावरील फुटपाथवर निवांत मांडी घालून वाऱ्यात गप्पा मारत बसायचो. कधी कधी तर मी एकटाच जायचो. रात्री १ - २ वाजे पर्यंत बसायचो. जरा वातावरण शांत झाले, सगळीकडे निजानिज झाली की शांत वाटायचं. एकदा असाच एकटा पुलावर वारं खात बसलो होतो. 
तितक्यात एक पोलिसांची गाडी आली......माझी विचारणा केली.....मी प्रामाणिकपणे सांगितलं की " रूम वर राहतो, खूप गरम होत होते म्हणून जरा हवेत फिरतोय" त्यावर ते काहीच न बोलता निघून गेले. आपण प्रामाणिक आणि न घाबरता बोल बच्चन दिले की काही त्रास होत नाही. हा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे... म्हणतात ना......' कर नाही त्याला डर कशाला '.

    आज पण शनिवार पेठत गेलो की ते सगळे बरे वाईट दिवस पुन्हा घडताना दिसतात. पुण्यात गेलो आणि गावात गेलो नाही तर..... पुण्यात गेलो असे वाटतच नाही. पुणे गावठाण म्हणजे कसबा, शनिवार,नारायण, सदाशिव,या पेठा मोडतात, डेक्कनने तर मला आपल्यात सामावून घेतले होतेच,पण आता जुन्या पुण्याने देखील सामावून घेतले.याच जीवावर पुण्यात इतकी वर्षे राहू शकलो.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०


2 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले