"शनिवार पेठ"
आमच्या हॉस्टेलचा एक नियम होता....आम्हाला फक्त दोन वर्षच हॉस्टेलमध्ये राहता येत होतं. तिसऱ्या वर्षी आपला मुक्कम हॉस्टेल मधून हलवावे लागतं होता. त्यामुळे दोन वर्षांनी हॉस्टेलचा अध्याय संपला !!!!! आणि दुसऱ्या रूमचा शोध सुरू झाला.
पुण्यात एखादी खोली भाड्याने मिळणे अवघड नव्हते...पण त्यासाठी ओळख लागायची. (म्हणजे ओळख असेल तर खोली मिळणे सोपे व्हायचे). एका सिनिअर मित्राच्या ओळखीमुळे आम्हाला एक जागा मिळाली...तीही शनिवार पेठेत!!!!! जुन्या पुण्यातील पेठ भागात प्रवेश मिळणे ( भाड्याने) म्हणजे एखाद्याने एकही प्रश्न न विचारता दार उघडण्यासारखे होते. (आता काही बदल झाले असतील......अशी उगाच माझी अपेक्षा). अर्थात, घरमालकाने आम्हाला त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय खोलीची किल्ली दिली नव्हती.
आमची खोली म्हणजे एका मोठ्या वाड्याचा एक छोटा हिस्सा होता, खोलीची साइज साधारणतः १४*१२ व एकाचे भाडे ४०० रूपये! हा वाडा पिढ्यानपिढ्या चालत आलेला, त्याचे बांधकाम ही खूप जुने होते. वाडा तसा दोन मजली आणि मोठा होता. खाली ६-७ खोल्या आणि वरती पण २ मोठे हॉल आणि ५-६ खोल्या. जुन्या पद्धतीचे माळवदाचे बांधकाम केलेले होते. (माळवद म्हणजे छतासाठी ऊभे,आडवे लाकडाचे मोठे मोठे ओंडके वापरून त्याच्यावर माती, शेण,आणि इतर काही वस्तू एकत्र करून घालतात).
वाड्यातील वरील मजल्यावर असलेल्या हॉलला मध्येच खड्डा होता (जो हॉल ची फरशी खचल्यामुळे तयार झाला होता), तो रात्री लक्षात ठेऊन चुकवावा लागे. हा वाडा एखाद्या जीर्ण जख्ख म्हाताऱ्या सारखाच होता. त्यातील अनेक बिऱ्हाडं पण तसेच होते.
आमच्या त्या खोलीत एक मोडका कॉट (ज्याला बसून बसून मध्येच बाक ही आलेला), एक खाली जमिनीवर गादी आणि फडताळे (भिंतीतले कपाट) एवढ्याच गोष्टी होत्या. त्या छोट्या खोली मध्ये आम्ही दोन मित्रांनी आपले हात लांबवले की दोन्ही भिंतींना हात लागत असत. ती खोली मला नेहमी वीर सावरकर यांच्या खोलीची आठवण करून देत असे.
आमच्या या खोलीला लागून अजुन एक तशीच खोली होती. आम्ही त्या खोल्यानां जुळ्या खोल्या म्हणायचो. त्यापैकी एका खोलीमध्ये माझा एक मित्र आणि मी रहायला आलो. पहिल्या खोलीत आम्ही राहायचो आणि पुढच्या खोलीत घरमालक कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे क्लास घ्यायचे. आमचे घरमालक डोक्याने खूप हुशार होते, पण स्वभाव चिडका! कायम तोंडात मसाला तंबाखू, त्यामुळे बोलताना तोंडाचा वास यायचा. खर्जात पण हळू आवाज, लालसर गोरा चेहरा, घारे मोठे डोळे आणि कायम हाताची घडी घालून बोलायचे. समोर खिसे असलेली सेमी बेलबाॅटमची पँट, आकाशी वा निळा अर्ध्या बाह्यांचा इन केलेला शर्ट अशा वेशात ते कायम असतं. ते क्लास घ्यायला आमच्या खोलीतून त्यांच्या खोलीमध्ये जायचे आणि रूम मध्ये फुल बाहीच्या बनियन वर मुला मुलींना शिकवायचे.
पहिल्या वेळी हे खूप विचित्र वाटले होते. आमच्या खोलीतून मुलं,मुली दुसऱ्या खोलीत क्लासला जायचे. हे म्हणजे रेल्वेचा एक डब्बा ओलांडून दुसऱ्या डब्ब्यात जाण्यासारखेच होते. नंतर आम्ही याला सरावलो आणि क्लासच्या आधी सावरून, आवरून बसायला लागलो. त्या दुसऱ्या खोलीत रेल्वे सारखीच खडखड चालत असे, ती खडखड रात्री वाढायची. काही दिवस सहन केल्यावर मात्र त्याचा छडा लावायचा असे ठरवले. एक दिवस रात्री आम्ही झोपलो होतो, सरांच्या खोलीतून आवाज यायला सुरूवात झाली....म्हणून आम्ही त्यांच्या खोलीचे दार उघडून अंधारातच त्या खोलीत प्रवेश केला. खोलीतील लाईटचे बटन काही केल्या सापडतं नव्हते...एकदाचे कसे बसे सापडले...आणि लाईट सुरू करून आम्ही आवाजाच्या दिशेने पुढे सरकलो...आवाज एका जुन्या ऑईलच्या काळ्या कॅन मधून येत होता. हळूच त्याचे झाकण उघडले...तर काय?????..... त्यात पाणी.....आणि दोन कासवं !!!!
जे आरामात पाण्यात पोहत होते, त्यांची पाठ त्या ऑईल कॅनला बडवत होती. ...म्हणून तो खडखडाट सुरू होता. एकूण एका सस्पेन्स चा पर्दाफाश करण्यात आमच्या काही रात्रीची झोप गेली होती. त्यांच्याकडे पोपट होताच, मांजरी ते रूम वर आले की यायच्याच...आणि आता हे कासवं....असे हे त्यांचे प्राणी संग्रहालय होते. नशीब आमची गणती त्यांनी प्राण्यात केली नाही.
माझ्या कॉटच्या वर एक जुनी लाकडी ३*३ची खिडकी होती. त्या खिडकीची दारं विशिष्ट पद्धतीत मिटले की त्या खिडकी मधून मस्त गार वाऱ्याची झुळूक येत असे, ती तशी झुळूक आल्हाददायक होती कारण रूम मध्ये पंखा नव्हता. उन्हाळ्यात फार गरम व्हायचे.
खरंतरं या वाड्यात आम्ही दोन ते अडीच वर्षे कसे राहू शकलो हे आश्चर्यच आहे. रात्री हा वाडा एकदम भयपटाचीच आठवण करून द्यायचा. त्यात बाथरूम - संडास ला जाणे हे तर दिव्य होते.....तिथे जायला १०- १२ पायऱ्या उतरून खाली जावे लागत होते. रात्री खाली जाताना कधी समोरून घुस, मोठाले उंदीर जायचे. अंगणात एक बारीक बल्ब, तसाच एक खाली बाथरूम - संडासात बारीक बल्ब असे.
वाड्याच्या मागील अंगणात मध्यभागी सोनचाफ्याचे झाड व त्यावर मालकांनी बांधलेल्या शिड्या नेहमी साप शिडी सारख्या वाटत असतं. ते या शिड्यांचा वापर करून सोनचाफ्याची फुले तोडून विकत होते. वाड्यात अनेकांची बिऱ्हाडं होती आणि काही आमच्या सारखी मुले देखील! किती लोक...किती विविध त्यांचे स्वभाव, किती वेगळे त्यांचे जगणे आणि व्यथा ही ... पण तरीही ही सगळी मंडळी एकत्र राहत होती.
एक उत्तम पेटी वादक होते, त्यांनी आपल्या उभरतीच्या काळात अनेक दिग्गज गायकांना साथ केली होती. पुणे आकाशवाणी वर अनेक कार्यक्रम केले होते. पण आता उत्तर आयुष्य असह्य शारीरिक व्याधी व आर्थिक अडचणीतून जात होते.
त्या विरूद्ध एक काकू होत्या त्यांच्यासाठी आयुष्य मजेत जात होते. त्यांच्याकडे रेल्वेचा फुकट पास होता त्यामुळे त्या फक्त २- ३ महिनेच खोलीत राहायच्या बाकी फक्त प्रवास करायच्या. त्यांना मी दोन वर्षात फारच कमी वेळा वाड्यात पाहिले व बोललो आहे. त्यांना कोणतेही शहर वा राज्य विचारले की त्या म्हणायच्या "किमान २-३ वेळा जाऊन आले मी."
हे दोन चित्र पाहून मला त्याही वेळा खूप वाईट वाटे...खरंच आयुष्य किती वेगवेगळं असतं...?
एकजण पैसे आहेत म्हणून उपभोगत होत्या आणि दुसरा नाही म्हणून अन्नान्नदशेत! खूप भयानक परिस्थिती होती..... त्या उत्तम कलाकाराला उत्तर आयुष्य कसे जगावे या प्रश्न होता, तर काकूंना आयुष्यात काहीच उरले नाही म्हणून मज्जा करण्यात समाधान वाटायचे.
या वाड्यात मला एक गोष्ट नक्की उमजली ती म्हणजे आपल्या गरजा कमी असाव्यात. आपण सगळीकडे प्राप्त परिस्थितीत स्वतःला सावरून घेतले की जगणे सोपे आणि आशावादी होते.
"कुठपर्यंत आलात तुम्ही? अच्छा अच्छा, पोलिस चौकी पर्यंत! बरं बरं......आता आधी डावीकडे वळा....मग उजवीकडे......मग आधी मोठा रस्ता.....मग....लहान गल्ली.....मग त्या गल्लीत उजव्या हाताला जमिनीवर नळाचे १०-१२ पाईप दिसले, की त्याला सोबत करत तसेच पुढे पुढे या.....मग एक बोळ लागेल.....आणि जिथे नळाचे पाईप आणि बोळ संपेल तेथेच डाव्या हाताला निळ्या रंगाची भिंत असणारा वाडा.... तिथेच आम्ही राहतो....!"
असा रूमचा पत्ता मी अनेक जणांना सांगत होतो. कारण सुरवातीला आम्हाला घर नंबर माहीत नव्हता.जसा जसा वाड्याचा आणि तेथील माणसांचा परिचय झाला तेव्हा बऱ्याच गोष्टी समजल्या.
सुरुवातीला ही खोली आम्ही फक्त गरज म्हणून घेतली होती. आपण पुढे मागे ही जागा सोडून दुसरीकडे जाऊ असा विचार केला होता. पण तसे करणे शक्य झाले नाही...आणि येथेच रहायला लागलो!!! थोड्या दिवसांनी नित्यक्रम मार्गी लागले... कॉलेज...मेस...क्लास....शाखा... आणि झोपायला खोलीवर!एकदा रूटीन बसलं की आपण पटकन सेट होतो.
आम्ही खोली भाडे तत्वावर घेताना आमचा असा समज होता की आम्ही आख्खी खोली भाड्याने घेतली आहे. त्यामुळे त्यात दोन काय आणि चार काय? सगळ्यांना खोलीत सामावून घेऊ शकतो. याच विचाराने माझे आणखीन दोन मित्र आमच्या रूम वर काही दिवसांसाठी रहायला आले.
मालक स्वतः त्या वाड्यात राहत नव्हते. तसेही ते फक्त सकाळी व संध्याकाळी वाड्यात फेरी मारायचे (त्यांचा क्लास आमच्या खोलीच्या बाजूलाच असायचा) ; इतर वेळी व रात्री कधीही ते वाड्यात येत नव्हते. त्यांच्या या सवयीचा आम्ही बरेच दिवस फायदा घेतला.
पण एक दिवस अचानक रात्री ते वाड्यात फेर फटका मारायला आले. तेव्हा आमच्या त्या छोट्या रूम मध्ये आम्ही ७ ते ८ जणं गप्पा मारत बसलो होतो. आम्ही त्यावेळी सगळे जण वाड्यातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायचो. पण त्यांच्या समोर इतके सगळे एकत्र आल्यामुळे ते जरा सावध होऊन आम्हाला विचारत होते....."तू कोण?...तू कोण....?" त्यांना बऱ्याच जणांचे चेहरे माहित नसल्यामुळे आमचे २ पाहुणे मित्र बरोबर त्यात लपून गेले आणि त्यांना काहीच समजले नाही. याचे अजून एक कारण म्हणजे आम्ही कधीच एकत्र जाऊन त्यांना भाडे देत नव्हतो. प्रत्येक वेळी एकच जण जाऊन पैसे देऊन येत होता, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे त्यांच्या लक्षात नव्हते.
पण त्या दिवसानंतर त्यांना काहीतरी शंका आली हे नक्की!!! वाड्यातील काही छुपे माहितगार त्यांना आमच्याविषयी माहिती पुरवत असावेत हे निःसंशय! अन्यथा कोणता माणूस इतका मोठा वाडा असाच लक्ष न देता भाड्याने देईल? मालक जरी चाणाक्ष होते,बारीक लक्ष ठेऊन होते. तरी आम्ही काही त्यांच्या हाती लागत नव्हतो. आम्ही शेंड्या लावण्यात तरबेज झालो होतो.
माझा रोज सकाळी क्लास असे, त्यामुळे मी पहाटेच रूम मधून बाहेर पडत होतो. त्यावेळी आम्ही ३ जणं रूम मध्ये राहायचो.....एका कॉट वर मी आणि खाली जमिनीवर दोन जणं! मी उठलो की खालचा एकजण कॉटवर येऊन तोंडावर पांघरूण घेऊन झोपत होता. हा असा गनिमी कावा अनेक दिवस सुरू होता.
मालक नेहमी प्रमाणे सकाळी क्लास घ्यायला यायचे. तेव्हा कॉटवर मित्र झोपेच सोंग घेऊन पडत असे, ते वाड्यातून गेले की हा उठायचा.......असा नित्य कर्म सुरू होता. न राहवून शेवटी एक दिवस मालकांनी हळूच पांघरूण वर करून पाहिलेच.....पण नशीब त्यावेळी तो मित्र पोटावर झोपला होता, त्यामुळे त्याचा चेहरा त्यांना दिसला नाही.
काॅट बेसिस वर पैसे देणारे चौघे....आणि त्याबदल्यात राहणारे सहा व सात जण असा गोतावळा असायचा. आमचे पाहुणे मित्र असे काही वाड्यात राहायचे जणू काही तेच अधिकृत भाडेकरू आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबत कधीच कोणाला शंका आली नाही आणि जागेसाठीची ही बनवा बनवी त्यावेळी यशस्वी झाली.
आमचे अनेक मित्र ' अशी ही बनवा बनवी ' करत आमच्या खोलीवर राहिले आहेत....! आणि तुम्हाला तर माहीतच आहे ....युद्धात आणि मैत्रीत......सारे काही क्षम्य असते!!!!
शनिवार पेठ ही खूप जुनी जाणती पेठ आहे. आमच्या वाड्यात जशा अनेक घटना घडल्या तशाच या पेठेत पण घडल्या आहेत. आमच्या रूम जवळ असलेला शनिवार वाडा, बाल गंधर्व, त्याला लागून असलेला पूल, ओंकारेश्वर मंदिर, कसबा गणपती या ठिकाणी आम्ही नित्य हिंडायचो. किती तरी रात्री आम्ही या बालगंधर्व आणि शनिवार वाडा येथील पुलांवर गप्पा मारत बसलो आहोत. दोन्ही पुलावर रात्री हात गाडीवर बदामशेक मिळते, खूप छान चव आहे त्याची, कधी शक्य झाले तर नक्की पिऊन पहा. या पेठेला खूप ऐतिहासिक महत्व आहेच आणि जुन्या पुण्यात या पेठेचा समावेश आधी होतो.






भारी....
ReplyDeleteखूप छान. निखिल.
ReplyDelete