Tuesday, May 18, 2021

" रस्ता रंग पितो"

 " रस्ता रंग पितो"



     हादू मागील बऱ्याच दिवसांपासून मजूर अड्ड्यावर आपल्याला  आज तरी काम मिळेल या विचाराने जात होता आणि दुपार पर्यंत वाट पाहून जड मनाने परत येत होता....! घराची जेमतेम परिस्तिथी. रखमा पाच सहा घराचे घरकाम करायची. पण करोना नंतर काही घरातील कामं बंद झाली....लोक आपल्या आपल्या गावी परत गेले आणि तिथूनच कामे करणे शक्य असल्यामुळे परत येणार नव्हते.

" काय हो, आज पण काम नाही मिळाले"?
" नाही, रखमा" उदास मानाने महादू म्हणाला
"जाऊ द्यात, उद्या मिळलं"

रखमाच्या बोलण्याने महादुला जरा धीर आला खरा..पण डोक्यातून विचार काही केल्या जाईनात,

    असे किती दिवस चालणार? काही तरी काम मिळाले पाहिजे...घरात पोरं आहेत.... रखमाच्या एकटीच्या कामावर कसं भागायचं...खोलीचे भाडे देऊन जे काही पैसे शिल्लक राहतील त्यात जे सामान मिळेल. त्यात कसेबसे भागवायचे.  असे अनेक विचार करत महादू आडवा झाला...पण त्याचा डोळा लागेना.

                                                        

"रखमा जरा जाऊन येतो"
"अहो, आता उन झालय, संध्याकाळी जा."
"नको, आलोच"
"अहो पण कुठं चालले?
"जरा जुन्या साईट वर जाऊन येतो."
"पण तिथे असलं का कोणी?"
"पाहून तर येतो. साहेब असेल तर!"
"बरं या जाऊन."

    संध्याकाळ झाली तरी महादू परतला नाही...रखमा जरा काळजीतच होती, तशातच तीने स्वयंपाक केला. पोरांना जेऊ घातले..... तरी महादू आला नाही...सुदैवाने त्याला कोणतेच व्यसन नव्हते. ही एक जमेची बाजू होती.

वाट पाहून पोरं पण झोपी गेली. रात्री उशिरा महादू परत आला. 

" रखमाss, रखमाss..."
"काय झाले हो ?"
"अगं, लई खुश आहे बघ मी,पोरं झोपली?"
"हो तुमची वाट पाहून झोपली".
"हे घे...चार पेढे आणले, देवा समोर ठेव".
"अहो, हो ....पण पेढे कशाला आणले, अन् त्याला पैसे ?"
"अगं गाडीत पन्नास रुपयाचे पेट्रोल टाकायला ठेवले होते, पण चाळीस रुपयांचे भरले आणि दहाचे पेढे आणले."
"असं होय, पण पेढे कसं काय आणले?"
"अगं काम मिळालं...."
"काय सांगता. कुठं? कसं? अन् कधी पासून जाणार कामाला? बरं झालं बाई!!"
"हो हो सगळं सांगतो, पण आधी जेवाया वाढ, खूप भूक लागली आहे."
"होय हो, सकाळ पासून उपाशी आहात."

    पोरांच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत दोघे जेवायला बसले, 

"आता सांगा बरं, काय काय अन् कसं कसं झाले ते?"
"अगं हो, दोन घास तर जाऊ दे की माझ्या पोटात,

    जुन्या साईट वर गेलो, पण इंजिनियर साहेब नव्हतं,  त्यांचे एक असिस्टंट होते... त्यांना भेटलो....त्यांना सगळे सांगितलं मी कोण हाय, इथं का आलो... पण ते बी म्हटले की इंजिनियर साहेब आले की त्यांस्नी या. 

                          

    मग मी बी इरीस पेटलो..साहेब येईल तो पर्यंत वाट पाहूच आता. लय वेळानी साहेब आला..त्याला भेटलो...त्यांनी पण सगळे बोलणे नीट ऐकून घेतले आणि माझ्यासाठी चार पाच फोन पण केले.

" मग पुढे काय हो?"
"अगं हो आधी भाकर , जरा चटणी आणि तेल पण टाक मग पुढचं सगळं सांगतो"

    साहेब पुढे म्हणाला " महादू तू खरंच मेहनती रंगारी आहेस, प्रामाणिक आहेस, आणि विशेष म्हणजे निर्व्यसनी आहेस म्हणुन तुझ्यासाठी हे प्रयत्न करतोय, दुसऱ्यासाठी केले नसते."

"देवच पावला.. ही देवाचीच कृपा की हो"...रखमा ने लगेच एका कोपऱ्यातील देवांच्या फोटोला बसल्या जागेवरून हात जोडले.

                                                

" हो ग त्याचीच. मग साहेबांनी एकाला फोन लावला आणि बोलणे केले आणि मला उद्या 'नागनाथ साहेब' यांना भेट म्हणून सांगितलं..."

    मला कुठला धीर धरवला " साहेब,त्यांसी आजच भेटू का विचारता का? कामाची लय नड आहे जी मला "

राकेश साहेबांनी परत त्यांना फोन लावला आणि त्यांनी लगीच भेटायला बोलवील......भाकरीचा तुकडा मोडत महादू म्हणाला,

" कोण, तू महादू का?
"हो साहेब"
"राकेश बोलला मला तुझ्या बद्दल.."
"हो जी, मी बी होतो त्यांच्या बाजूला..कामाची लय नड आहे मला, माझ काम पहा जी, तक्रारीला जागा देणार नाही साहेब....आणि रंगाचं काम वेळेत पुर करून देतो....पाहिजेल तर राकेश साहेबांना विचारा...."
" अरे हो, तू काम नीट करतोस हे सांगुनच राकेशनी तुला मला भेटायला पाठवले न.!! माझ्या दुसऱ्या घराचं काम करायचे आहे पण ते येथून जवळच आहे. तुला वेळ असेल तर जाऊ हवं तर लगेच."
" हो जी" ,
"माझ्याच गाडीवर जाऊ....."

"असं म्हणून त्या साहेबांनी त्यांच्याच गाडीवर मला माग बसवलं आणि नेलं त्या दुसऱ्या घराकडे"  महादू हात पुशीत पुशीत सांगत होता....

"त्या नागनाथ साहेबांनी घर दाखवलं, त्यांच्या सगळ्या खोल्या पाहिल्या, सगळे घर पाहून त्याचा एक हिशेब मांडला आणि ते बी लगेच होय म्हणाले...."
"महादू उद्या पासून कर सुरू काम....कितीला येतोस.?"
"सकाळी येतो जी लवकर..... आधी एका दिवसात जुना रंग घासून काढतो....एक शिडी अगर उंच स्टूल हाय का?"
"हो आहे, उद्या सकाळी देतो तुला...."

    समद बोलणं झालं...पैसे ठरले...आणि लगेच घराकड निघालो बघ.रखमा समदा दिवस याच खटपटीत होतो म्हणून यायला लय वेळ झाला...जेवण करून महादू आडवा पडला...रखमा अजून घरातील इतर काम संपून खोलीच्या बाहेर शेजारील बायकांच्या गप्पात मिसळली...

    महादू आडवा पडला तरी त्याला झोप काही लागेना...विचार सुरूच होता..तो उठला आणि त्यानं आपली कामावरची पिशवी काढली, त्यात रंग कामाचे कपडे भरून ठेवले...जुना ब्रश आहे का ते पाहिले....रंग घासायला पत्रा आहे न ते तपासून पाहिला.....आणि सगळे नीट आहे हे पाहून, ती पिशवी त्याने जवळच घेतली...

    त्याच्या मनात कामाबद्दलची ओढ होती आणि मिळालेले काम नीट होईल ना...... या विचाराने त्याची चलबिचल सुरू होती.

एकदा पिशवी जवळ ठेवल्यावर तो निर्धास्त झाला. तोवर रखमा पण घरात आलीच ...

"काय हो!!! आताच जाता का काय कामावर...लयच गडबड बाई...अहो होतय नीट सगळं. झोपा गुमान आता...." सकाळी महादू लवकरच उठला आणि रखमा कडून डब्बा आणि सामानाची पिशवी घेऊन बाहेर पडला...

" रघू  एक पन्नास रुपये आहेत का बाबा...गाडीत पेट्रोल टाकायला पाहिजेल रे...आज कामावर चाललोय...."

रघू पान टपरीवाला त्याचा खास दोस्त होता, त्यानं पण लगेच पैसे दिले. गाडीत पेट्रोल भरून कामावर महादू हजर झाला...जरा वेळ झाला पण नागनाथ साहेब अजून यायचा होता. महादूने साहेब यायच्या आत कपडे बदलून कामाला सुरुवात केली.....

"काय रे महादू...आलास!!!..आणि काम पण सुरू केले का....शाब्बास....मी तुझ्यासाठी एक लाकडी घोडा आणला आहे जरा हलतोय पण पहा काम होईल का ते...."
"होईल जी...एक पट्टी ठोकून घेऊ...मग नाही हलणार...आधी खालचा जुना रंग घासून घेतो..."

    
      

    महादू खरंच मेहनती होता, त्यानं दिवसभरात हळू हळू जवळ जवळ चार खोल्यांचे ते घर घासून टाकले... संध्याकाळ झाली आणि महादूने काम थांबवले...
" साहेब, आजचं काम तर झालं जी, उद्या सकाळी वेळेत येतो.... ( थोडं घुटमळत अन् अडखळत) एक विचारू का साहेब....."
"बोल की...."
"आज जरा, कामाची मजुरी मिळाली असती तर बरं....म्हणजे आज पहिलाच दिवस आहे... बवनी झाली असती..."
"हत तुझ्या, हेच न, हे घे"
साहेबांनी पैसे दिले... महादुने ते आनंदाने घेतले...
" साहेब उद्या प्रायमर तुम्ही घेऊन येता की मी अानु माझ्या दुकानदाराकडून, पक्क बिल पण आणतो. साधारण चारशे ते सहाशे रुपयात मिळेल आपल्याला किमान दोन डब्बे तरी लागतंय..उद्या एकच घेऊन यावा लागलं मग दुसरा नंतर आनु"
"अरे, तु येताना घेऊन येऊ शकणार असशील तर घेऊन ये त्याचे पैसे पण आताच देतो"

    असे म्हणून अजून पाचशे रुपये नागनाथ साहेबांनी महादूला दिले.

आनंदाच्या भरात महादू घरी पोहचला..रखमा आज लय दिवसांनी कमाई करून पैसे मिळाले गं...पोरांना कडेवर घेऊन महादू घरात फिरत होता...त्याला आज मनापासून आनंद झाला होता. 

घरी येतानाच रघूचे उसने पन्नास रुपये परत करून आल्यामुळे मनावरचे ओझ कमी झाले होते.

उधारी उसनवारी नको म्हणून लगेच त्यातून तो मोकळा झाला होता. आज बऱ्याच दिवसांनी त्यांच्या खोलीत आनंद पसरला होता...नाहीतर मागील अनेक महिन्यात खोलीत फक्त काळजी आणि पुढे काय याची चिंता होती.

आता किमान या नवीन कामाच्या जोरावर अजून काही कामं मिळतील आणि परत जरा बरे दिवस येतील याची देवाला प्रार्थना करत महादू, रखमा आणि दोन पोरं एकत्रित जेवली आणि झोपली.

"रखमा अग डब्बा दे लवकर...अजून दुकानातून प्रायमर घ्यायचा आहे...कामावर उशीर होईल"असे म्हणून महादू गाडी काढायला गेला.
"हो, हे काय झालाच, हे घ्या जी" 

    आपल्या नवऱ्याच्या मेहनती आणि निर्व्यसनी स्वभावामुळे रखमा पण समजुदार पणे संसार करत होती. तिने त्याला गाडीवर डब्बा नेऊन दिला.

"येतो गं सांजेला..."

पाठमोऱ्या महादूकडे पाहून तिच्या मनात आले..आपल्या संसाराच्या गाडीचे दुसरे चाक पण कामाला लागले...देवाची अशीच कृपा राहू देत.

" गणपत शेठ, ओ गणपत शेठ..."
" कोण ? महादू....लय दिवसांनी आला बाबा....काय म्हणतो? कसं काय आलास?"
"जरा एक वॉल प्रायमर पाहिजेल..आपला नेहमीचा.."
"अरे तू किती दिवसांनी आला आहेस, लक्षात कसे राहील तुझा प्रायमर कोणता ते..."असे म्हणत दुकानदाराने त्याला प्रायमर दिला.

    महादूने त्याचा नेहमीचा वॉल प्रायमर घेतला ...त्याचे पक्के बिल घेतले आणि डब्ब्याचे झाकण उघडुन नीट आहे न? याची शहानिशा केली...झाकण परत नीट लावले. पैसे दिले आणि कामावर निघाला....

    महादू उशीर झाला म्हणून पटकन प्रायमरचा डब्बा गाडीच्या मागे अडकवला...गाडीला किक मारली आणि लगेच घाईने निघाला...!

"आज कामावर पोंचायला उशीर झाला आहे, नागनाथ साहेब आले असतील तर त्यांना वाटलं आपण दुसऱ्याच दिवशी खाडा केला....कालच त्यांनी आपल्याला मजुरी व प्रायमरला पैसे दिले..आपण त्यांचा विश्वास मोडला नाही पाहिजे...या कामावर नीट काम केले तर कदाचित अजून लगेच पुढचं काम मिळेल......." 

    गाडी चालवत असताना महादूच्या डोक्यात या सगळ्या विचारांची गर्दी  झाली असतानाच...नेमका रस्त्यात एक गतिरोधक आला....

    गाडीचा ब्रेक मारून गती कमी करणे शक्य नव्हते म्हणून त्याने तशीच गाडी त्या गतिरोधकावरून घातली आणि... खळळ असा आवाज झाला...

    गतिरोधक ओलांडून तो जरा पुढे गेला होता.. मागे वळून पाहतो तर काय???

"रस्त्याने सर्व रंग पिला" होता. ( पांढरा वॉल प्रायमर ) डब्याचे झाकण निघून पडले होते आणि सगळा पांढरा 

                        

    प्रायमर रस्तात सांडला होता...

   आपल्याला खूप मेहनतीने काम मिळालं... त्याची पहिल्या दिवसाची मजुरी मिळाली.. साहेब आता आपल्याला काय म्हणेल, या विचारानं महादू गलितगात्र झाला. त्याने रस्त्यात सांडलेला प्रायमर हाताने डब्ब्यात परत भरण्याचा प्रयत्न केला...पण तो व्यर्थ ठरला...

    मनात भीती आणि नकारात्मकता घेऊन कसा बसा नागनाथ साहेबांच्या घराकडे आला.

"साहेब....साहेब.... बाहेर या अगुदर...."
"अरे काय रे!!! महादू....तू काय रंग कामाचे कपडे आज घरूनच घालून आलास की का?"
"नाही जी...."

    त्याच्या संयमाचा बांध फुटला तो रडायला लागला.

"अरे काय हे महादू...असा का रडतोस?"
"साहेब साहेब, तुम्ही माझ्यावर लय लय मेहरबानी केली. पण मीच...".त्याने रडतच बोलण्याचा प्रयत्न केला
"अरे पण काय झालं ते तर सांग..."

    महादू ने झालेली सर्व घटना तपशीलवार सांगितली...

" साहेब कृपा करून मला कामावरून कमी करू नका. मला लय नड आहे हो या कामाची..."
"अरे वेड्या...हेच का....कशाला कामावरून कमी करू..उद्या नवीन डब्बा आण , मी तुझे पैसे पण नाही कापणार.... चल पाणी पी आणि लगेच कामाला लाग. झाले हे पुरे झाले...आजच काम पूर्ण करून घे. जा लवकर..."

    महादूसाठी हे सगळे एकदम निराळंच होते. नागनाथ साहेब त्याला रागावले नाहीत आणि पैसे पण कापले नाहीत. पुढे अनेक दिवसांनी घराचे रंगकाम महादूने चिकाटीने पूर्ण केले. पण महादूच्या मनातून काही केल्या ही घटना जात नव्हती..

" साहेब, काम कसे झाले?"
"छानच, आवडले मला."
"एक विचारू का?"
"हो विचार न"
"साहेब, माझ्याकडून जी चूक झाली...."
"अरे तुझ्या डोक्यात आहेच का अजून, पण विचार म्हणजे तू शांत होशील."
"म्हनजी, तुम्ही मला कस काय माफ केले, आणि नुसकानीचे पैसे बी कापले नाहीत"
"अरे ते पाचशे रुपये कापून मी काही श्रीमंत झालो नसतो, झाला तो फक्त एक अपघात होता...तुला या अडचणीच्या काळात, मला काम देऊन मदत करता आली हेच माझ्या करिता समाधान देणार आहे.

    असाच..हो.. असाच प्रामाणिक रहा आणि सकारात्मक रहा..."

"पण तरी साहेब..."
"अरे वेड्या माझा पांढरा वॉल प्रायमर वाया थोडीच गेला..!! रस्त्याने रंग पिला आणि काळा रस्ता पांढरा झाला.... आपण दृष्ट लागू नये म्हणून काळा तीट लावतो मग काळा रस्ता पांढरा रंगच लावणार नं....."
                        

( दोघे पण मनापासून हसत राहिले )

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०

7 comments:

  1. फारच छान..
    सकारात्मक

    ReplyDelete
  2. छान.
    असेच एकमेकांना समजून घेतले तर सामाजिक जीवन किती आनंदी होईल. हो ना?

    ReplyDelete
  3. वा! सकारात्मक विचार आहे.

    ReplyDelete
  4. खुप छान लेखन आहे

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले