*विश्वासराव तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाहीये!!!*
कोणते वर्ष नीट आठवत नाहीये..पण कदाचित २००३ असेल असे वाटते आहे. विद्यार्थी दशेत होतो आणि त्यावेळी अक्षरशः विद्यार्थी विस्तारकाप्रमाणे संघ काम करत होतो. रूम होती शनिवार पेठ ( संघदृष्ट्या कसबा भाग ) मध्ये आणि संघ काम घडत होते नळ स्टॉप ( संघदृष्ट्या संभाजी भाग)
'पंत ( श्रीधर पंत फडके) कसे आहात?' नेहमी प्रमाणे मोतीबाग कार्यायलात पंत दिसल्यावर मी प्रश्न विचारला.
पंतांनी मायेन हात धरत नेहमी प्रमाणे त्यांच्या कुर्त्याच्या खिशात हात घातला 'हे घे ' असे म्हणून माझ्या हातावर एक संत्रा गोळी ठेऊन बाकावर बसवत विचारले ..' कसा काय आलास? आज काय नवीन वाचलं?'
'काही विशेष नाही सहज आलो..जरा मधे रिकामा वेळ होता..म्हणून तुम्ही आहेत का, ते पाहायला आलो.' मी आपले त्यांना मोघम उत्तर दिले. आमच्या अशा अनेक विषयांवर गप्पा चालू होत्या तितक्यात एक उंच, सडपातळ, डोक्यावर अर्धे टक्कल, असे प्रचारक तिथे आले. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिले होते. तितक्यात मोतीबागेतील चहापानाची वेळ झाली. त्यामुळे आम्ही तिघे पण चहा घेण्यासाठी अन्नपूर्णा (भोजन कक्ष) मध्ये गेलो..
चहा घेता घेता त्या प्रचारकांनी माझी सगळी चौकशी केली, मी कोण? कुठून आलो? इथे काय करतो? कुठले कॉलेज? मूळ गाव कुठेलं?..इत्यादी.. हे सगळे विचारून ते चहा न घेताच निघून गेले.
मला प्रश्न पडला की हेच मला चहा घेण्यासाठी घेऊन गेले आणि यांनी तो घेतला नाही आणि निघून गेले. 'पंत यांचा परिचय काय?' मी पंतांना ते मोतीबागेतून निघाल्यावर विचारले.
'अरे हे विश्वासराव ताम्हणकर, तुझ्याच परभणीला प्रचारक होते.तेव्हा तुझा जन्म पण झाला नसेल. उर्दूचा खूप अभ्यास आहे त्यांचा' पंतांनी त्यांच्या बद्दल माहिती दिली.
'मग त्यांनी माझे मूळ गाव हे सगळे विचारले तेव्हा ते का म्हणाले नाही की ते माझ्या गावी प्रचारक होते.' मी उदास पणे प्रश्न विचारला.
उत्तरा दाखल पतांनी फक्त स्मित हास्य केले.
मग मात्र अनेक दिवसांनी मी फक्त विश्वासराव ताम्हणकर यांनच भेटायला मोतीबाग आलो होतो. कारण पण तसेच होते..मला 'उर्दू शिकवता का?' हा प्रश्न मी विचारताच ते एकदम आनंदी झाले मला चांगले आठवते त्यांचे वाक्य ' का नाही, अरे तरुणांनी नाही शिकला तर आपण सावध कसे होणार, आणि हे काम कसे वाढणार, ये ये मी नक्की शिकवेन अजून दोन तीन मित्र पण घेऊन ये. ' त्यांची इतकी तयारी होती. त्यामुळे मी काही दिवसच जाऊ शकलो, कारण आवड होती पण CA चा अभ्यास आणि त्यामुळे त्यांची वेळ आणि माझी वेळ जुळून येईना झाली..आणि माझे त्यांच्या कडे शिकण्यासाठी जाणे कमी कमी होऊ लागले. सुरुवात झाली पण पुढे शिक्षण घडले नाही. ही खंत आज पण आहेच..
पण नियती कशी असते पहा. काही कारणासाठी CA अर्धवट राहिले पण मागील दोन वर्षांपासून सांस्कृतिक वार्तापत्रची जबाबदारी घेतली तशी विश्वासराव ताम्हणकर यांची परत भेट सहवास , गप्पा, चर्चा, परभणीच्या त्यांच्या जुन्या आठवणी हे सगळे त्यांच्या कडून ऐकायला मिळाले. त्यांचे थेट आणि स्पष्ट मते देखील समजली..वाचन, लिखाण, यांचे अनुभव ऐकायला मिळाले. ऑफिसच्या कामात कायम प्रवास करत असल्यामुळे त्यांची वारंवार भेट होत नव्हती, पण जेव्हा व्हायची तेव्हा ते नेहमी म्हणायचे ' अरे वा, आज भेट झाली तुझी ' त्यांचा तो आत्मीय स्वर आज पण आठवतो आहे. जरा जड पण खार्ज्यातला आवाज कानात त्यांचा कायम कानोसा घेत राहील. सांस्कृतिक वार्तापत्र मधील ' मुस्लिम मनाचा कानोसा ' हे सदर उर्दू ते मराठी अनुवाद तेच करत असत.
माझी आई गेली तिच्या अंतिम काळात तिची सेवा घडली..त्यांना आईची अवस्था,माझी आणि बायकोची अवस्था,आमची ओढाताण याची पूर्ण कल्पना होती. आई गेल्यावर मी काही दिवसांनी ऑफिसला गेलो, तेव्हा त्यांनी मायेने पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले ' नशीबवान आहेस, आईची सेवा घडली, तुम्ही दोघांनी तिचे खूप केले हे मला समजले, पण तुमच्या भेटीला तेव्हा येता आले नाही. त्याचा राग मनात ठेऊ नकोस हं ' इतका सात्विक आणि संघभाव कसा काय येतो हाच त्यावेळी आपण मला प्रश्न पडला होता.
असे प्रचारक आम्हाला पाहायला, अनुभवयाला मिळाले हे केवळ काहीतरी पूर्वजन्मचे संचित असेल म्हणून या ईश्वरी कार्याची एक भाग होता येत आहे.
त्यांच्या दीर्घ आजारात मला एकही दिवस त्यांना भेटायला, पाहायला जमले नाही कदचित त्यांची ती अवस्था मला सहन झाली नसती. त्यांचा सतेच, करारी आणि थेट तोंडावर बोलणारा चेहरा माझ्या कायम मनात पक्का रहावा म्हणूनच त्यांची शेवटची भेट घेता आली नसेल...आज पण त्यांच्या जाण्याची बातमी मला प्रवासात असतानाच समजली. हे काम अखंड चालू ठेवावे हीच त्यांची अंतिम इच्छा असेल म्हणून त्यांचे अंत्यदर्शन देखील मला घेता आले नाही.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कडून अखंड संघ काम आणि हिंदुत्वाचे काम करण्याची प्रेरणा मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना..
निखिल देविदास वझे 🙏🏻

No comments:
Post a Comment