"मनमोकळे करायला...बोला"
![]() |
"काय काका, आज एकटेच जेवायला? मित्र नाही आले का अजून? मी, न्यू पुना बोर्डिंग डायनिंग हॉलच्या पायऱ्या चढत विचारले.
"नाही!! येतील, मी जरा लवकर आलो. बँकेत काही कामं होते, वाटले तिथे वेळ होईल पण माझे कामं लवकर झाले...मग सरळ इकडेच आलो जेवायला!!...तुम्ही काय म्हणताय? बऱ्याच दिवसांनी, हल्ली येत नाही वाटतं इकडे, म्हणजे बऱ्याच दिवसात दिसला नाहीत?"
"होय हो!!!, या करोनामुळे सध्या पुण्यात येणे कमीच आहे आणि आलो तरी कामे करून घरीच जातो, आज जरा उशिरापर्यंत कामे आहेत म्हणून इकडे येता आले."
"होय, खूप
वाईट दिवस आहेत हे. आम्ही सगळे पाहिले!! पण हे दिवस नको वाटतायतं, तरी
बरे माझे एक इंजेक्शन झाले आहे. आता पाहू दुसरे कधी मिळते ते!!!"
"काका, काही
त्रास नाही, नं?"
"जरा झाला, पण होते अजूबाजूचे सांभाळायला"
"अजूबाजूचे?" मी जरा विचारात पडलो.
पुण्यात आज असे अनेक एकएकटे राहणारे अनेक काका, काकू, आजी, आजोबा आहेत ज्यांना पाहायला कोणी नाही. आयुष्य पार करून ते आता उतार वयाला लागलेले आहेत.
हे श्री कर्वे काका, तसा माझा यांचा परिचय फक्त जेवणाच्या टेबलं पुरता. बाकी त्यांच्याबाबत माहिती कमीच, म्हणजे त्यांनी दिली तितकीच.
"काका,
मग इतके दिवस जेवणाचे काय केलेत?"
"ईश्वर कृपेने झाली सोय. पण जसे सगळे पूर्ववत सुरू झाले (म्हणजे unlock) तसे यायला लागलो परत इथे. पोटाला इथल्या अन्नाची फार फार सवय झाली आहे हो!!! आज अनेक वर्षे येथेच जेवतो आहे. दुसरे कोणतेच अन्न सहन होत नाही आणि यांनी पण घरी देण्याची सोय केली काही दिवस. पण त्यांचा पण व्याप मोठा आहे. आपल्या एकट्यासाठी त्यांना त्रास देणे सोयीचे वाटत नव्हते, म्हणून मीच जेवायला येणे सुरु केले".
"चला काका जागा झाली, तुमचे नेहमीचे टेबलं रिकामे झाले आहे. आपण बसू आणि मग गप्पा करू"
प्रशस्थ डायनिंग हॉल मधील कोपरऱ्यातील नेहमीचा टेबलं मिळाला कि काका खुष झाले.
"कमी दातांनी शांतपणे जेवताना वेळ लागतो, त्यामुळे हा आपला कोपरा बरा!!" हा त्या टेबलं मिळवण्याचा मूळ उद्देश काकांनी टेबलावर बसत बसत मला सांगितला.
"बरं झाले आज तुम्ही भेटलात. खूप बरं वाटलं. आपली माणसं दिसत नाहीत हो हल्ली, सगळे अनोळखी चेहेर दिसतात जेवताना. एक मालक आणि वाढपी तेवढे परिचयाचे, बाकी सगळे अनोळखीच."
काका मनमोकळेपणे बोलत होते. पूर्वी त्यांच्या सोबत मी कधीच गप्पा मारल्या नव्हत्या. पण आज कदाचित अनेक दिवसांचा माणसांचा संपर्क झाला नसावा म्हणून ते भरभरून बोलत होते. मी फक्त ऐकण्याचे काम करत होतो.
"हल्ली माणूस माणसाला दुरावला आहे नं!!! प्रभाकर आज जरा वाटीत साधं वरण पण दे बाबा आणि पापड नको!!"
कर्वे काका दिसायला एकदम परफेक्ट कोकणस्थ होते. अगदी लालसर गोरे, घारे डोळे, पातळ पांढरे केस, छातीवर दोन खिसे असलेले फिक्कट पण छान इत्री केलेला शर्ट, त्या शर्टच्या खिशात एक छोटी डायरी, काही कागद, पेन , शर्टला शोभेल अशी समोर खिसे असलेली पँट (एकदम जुन्या स्टाईलची) आणि पायात साधी चांबडी चप्पल. मी अनेक वेळा त्यांना अश्याच स्टाईल मध्ये पाहत आलो आहे.तशी आमची फक्त जुजबी तोंडओळख होती पण कधी सविस्तर बोलणे झाले नव्हते.
वाढप्यांनी आमची ताटं वाढायला सुरुवात केले होते. रस्सा भाजी, कोशिंबीर, आमटी, सुकी भाजी, "दह्याची वाटी नको त्यापेक्षा ताकच दे!!" अशी मागणी काकांनी केली. आमचे ताट वाढून झाले होते आता फक्त गरम पोळ्या येण्याची आम्ही वाट पाहत होतो.
"सात वर्षापूर्वी आमची ही एका जर्जर आजारात गेली. त्याआधी बिचारेने बरीच वर्ष अंथरुणात काढली, माझ्याकडून तिची जितकी सेवा घडली ती मी केली. पण एकदिवस तिचाच धीर सुटला. देवालाच तिची दया आली. आता या गोष्टीला खूप वर्षे झाली...पण मी एकटा पडलो...कोणी तरी म्हंटले आहे 'माणसाची बाई गेली की माणूसं फक्त शरीराने जगतो'....असो....विठ्ठलराव पोळी वाढा"
मला आज काकांचे खूप आश्चर्य वाटले!!! हे मला आज कधी नव्हे ते त्यांचं आयुष्य का सांगतायत? आम्हा दोघांचे जेवण सुरू होतेच...पण माझ्या मनात ही शंका येत होती.
"तुम्हाला म्हणून सांगतो. आपले आपले असे कोणी नसते या जगात. मी कधी पण निराश नव्हतो आणि पुढे पण नसेल. हे नक्की आहे, आम्हाला मुलं बाळ नाही. अहो असलेल्यांचे अनुभव पाहिले..हे आपले चव्हाण इथे येतात पहा जेवायला. तुम्ही पाहिले असतील कधी तरी. उंच, डोक्याला टक्कल, त्यांची जेवायला येण्याची वेळ झालीच आहे आता, येतीलच इतक्यात. तशी त्यांना भक्कम पेन्शन आहे!!! तरी त्यांचा पोरगा सून घरी पोट भरून जेवायला घालत नाहीत म्हणे!!, म्हणून रोज इथचं जेवतात.(काका दबक्या आवाजात मला माहिती देत होते)...असो..."
काकांची एक सवय माझ्या लक्षात आली, ते त्यांच्या भावना आवरायला नेहमी 'असो ' असे म्हणतं होते.
"आमची ही वारली, मग आपले पुढे काय? कोणी म्हंटले दुसरे लग्न करा, म्हातारपणात आधार वगैरे वगैरे, पण मी चक्क नाही म्हणालो. म्हंटले आता बसss. राहू आपण एकटे, काही होत नाही. पाहू पुढे जे काय होईल ते"
मध्येच डायनिंग हॉलचे मालक काकांच्या जवळ येऊन त्यांना काय हवं नको ते विचारून गेले. मालकांचे सगळ्या जेवणाऱ्या लोकांकडे आणि वाढपी कर्मचाऱ्यांवर कायम लक्ष असते. आज अनेक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे तो याच एका गुणामुळे. प्रत्येक जेवणारा माणूस हा आपला पाहुणा आहे याच विचारात मालक त्यांना नेहमी वागवत असतात. याच जोरावर आज जवळ जवळ ९५ वर्षे त्यांचा हा व्यवसाय टिकून आहे.
आता आमची जेवणं संपायच्या बेतात आली होती. काका मला मनापासून सर्व सांगत होते.
"एकटा अनेक वर्षांपासून राहतोय. रहायला स्वतःचे घर आहे, एकट्याला पुरेल इतकी पेन्शन आहे, कोणासाठी काही शिल्लक ठेवायची गरज नाही...कोणाचे बंधन नाही...जितके दिवस जगता येईल तितके दिवस राहू, पुढे काय कोणाला माहीत? 'तूप घे रे जरा' मध्येच त्यांनी ओर्डर दिली. आपण फक्त सकारात्मकपणे जगत रहायचे. सकाळी एकतास सोसायटीच्या आवारात फिरतो, एक तास पेपर वाचत बसतो, घरकामासाठी एक मुलगी येते. केर, लादी, कपडे धुणे अशी कामे करते आणि मग मी पण घरा बाहेर पडतो. येथे जेवून परत घरी जातो...दुपारची वामकुक्षी....आणि परत संध्याकाळी मित्रांसोबत पत्ते, गप्पा, जरा टिव्ही, पण रात्र नको होते हो...दिवस कामात निघतो. पण रात्री एकटेपण कधी कधी असह्य होतो. मग कधी कधी रात्र भर टिव्ही पाहतो, नाहीतर वाचत बसतो आणि तेही करून झाले कि खिडकीजवळ बसून राहतो.
"तुम्हाला
वाटतं असेल हा माणूस इतके दिवस आपल्याला कधीच काहीच बोलला नाही आणि आज का बोलतोय, होय नं?"
"हो काका, अगदी मनातील ओळखलं"
"डोक्यावरचे उगाच पांढरे नाही झाले!!! असे म्हणून डाव्या हाताची तर्जनी डोक्यावरच्या केसांकडे दाखवली, अहो माझे असे कोणी नाही. या करोनामध्ये कोणाशी मनमोकळे बोलणे होत नाही. जे होते ते फक्त फोनवर, त्यात ती समोरची व्यक्ती दिसत नाही. जो तो आपल्याच काळजीत आणि दुनियेत आहे. म्हणजे ते योग्यच आहे, प्रत्येकाला आपला आपला संसार आहे. आम्ही काय एकटा जीव...मग मनमोकळे होत नाही. तुम्ही मला आपले वाटलात म्हणून सांगितले. उद्या चालून काही बरे वाईट झाले तर किमान कोणाला तरी माहीत असेल हेच काय ते समाधान" ताक भाताचा शेवटचा घास घेत काका म्हणाले.
आमच्या दोघांची जेवणं झाली. हात धुवून आम्ही वरच्या मजल्यावरील डायनिंग हॉल मधून खाली आलो. काकांनी त्यांची जुनी लाल एमटी काढली. मी पण माझी गाडी काढली.
"बरं मग भेटू!!!"
"हो, भेटू काका,"
माझ्या या वाक्याने त्यांच्या चेहऱ्यावर जरा आनंद दिसला. त्यांनी खिशातून मास्क बाहेर काढला, बांधायच्या आत त्यांचा चेहरा मी परत एकदा वाचला. ते आज एकदम निर्थास्त वाटले, आपले मन कोणासमोर मोकळे झाले याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले. आता आमच्या दोघांसमोर पण आपापले रस्ते होते.

पण
माझा चेहरा मात्र काळजी आणि
विचारात गर्क होता. समाजात असे किती लोक असतील, कोण आहे त्यांना मनमोकळे करायला, बोलायला? मी याच विचारत तोंडावर मास्क बांधला आणि गाडी काढली...
©निखिल
देविदास वझे
९०११०९६२५०






खर आहे. आज बोलायला माणस मिळत नाहित. ह्यात त्यांची काही चुक नाही. प्रत्येकाची काही तरी दुनियादारी चालूच असते..... असो....
ReplyDeleteKhup Chan aahe lekh
ReplyDeleteKeep it up
Wow..kharay ani Chan experience share kela tumhi
ReplyDeleteआपण कथा फार छान लिहिली आहे. बारकायीने विचार करता असे लक्षात येते की अशी परिस्थिती ही सुमारे गेल्या वीस वर्षा पासून बदलत चालली आहे ह्याला कारण आईशआरामात जगण्याची लागलेली सवय ह्या मुळे माणूस नाती गोती विसरत चालला आहे. परंतु ही परिस्थिती बदलायची असेल तर ज्या घरात असे घडत आहे तेथील लोकांनी आत्माकेंद्रित नं होता मनाचं विकेंद्रिकारण करण गरजेचं आहे.
ReplyDelete