Tuesday, May 11, 2021

"छोट्या फुलपाखरास... गरुडपंख मिळो"

 "छोट्या फुलपाखरास... गरुडपंख मिळो"



पल्याला कोणाचा मामा करायला खूप आवडतं आणि पण आपलाच मामा झाला तर आपल्याला रागही येतो,हो न!!! पण माझे नेमके उलट झाले, देवाच्या कृपेने दोनदा मामा झालो आणि त्याचा आनंदच झाला.

    "ताईला मुलगी झाले रेss, ताई आणि मुलगी दोघी पण सुखरूप आहेत, तुला येता आले की ये, एक दोन दिवसात" आनंदी मनाने बाबांनी फोनवर ही गोड बातमी दिली.  

    माझ्या अगोदरच बायको  गावी गेलेली होती, त्यामुळे कामाला मदत आणि पळापळीसाठी एक जास्तीच माणूस आईबाबांच्या  हाताखाली होते. माझी कामे संपवून मी काही दिवसांनी निघणारच होतो. 

     मी पण गावी जायचे नक्की केले,  सकाळीच ट्रॅव्हल्सच तिकीट काढले. हो त्यावेळी तिथे जाऊनच तिकीट काढावे लागत होते. तिकीट बुकिंगचे विविध ॲप उपलब्ध नव्हते. रात्री ९ वाजता गाडीत बसायचे होते. दुपारचे जेवण झाले आणि परत प्रचंड दाढ दुखायला लगली. तसे या आधी दोन तीन दिवसांपासून त्रास होतच होता. तेव्हा डॉक्टरांकडून तपासणी करून गोळ्या घेतल्या होत्या. पण आज परत दाढ दुखायला सुरुवात झाली.

" तुमची अक्कल दाढ अडकली आहे, छोटे ऑपरेशन करून काढून टाकावी लागेल, काही टाके पण घालावे लागतील, जास्त नाही २ ते ३, कधी करायचे ते सांगा? जेवण झाले आहे न!!!"

    प्रसिद्ध डॉक्टरांच्या डेंटिस्ट चेअरवर आडवा होतो, माझा आssवासून उघडा जबडा, त्यात डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या हाताने माझे तोंड उघडून धरलेले, उजव्या हातात कसले तरी आरसा असलेले हत्यार, अशा अवस्थेत मी त्यांना काय म्हणणार?                


" करा, काढून टाका !!! "मी धीर एकवटून बोललो.

    दुपारी जेवण झाले त्यानंतर मी फक्त चहा घेऊन डॉक्टरांकडे आलो होतो. पण आता वेळ घालवणे शक्य नव्हते. एकतर रात्री प्रवास पण करायचा होता. वेदना पण सहन होत नव्हत्या त्यामुळे कधी तरी हा त्रास कमी करण्यासाठी हे धाडस करावेच लागणार होते. मग हाच मुहूर्त धरला.

" एक अर्धा तास बाहेर बसा...एकदोन पेशंट पाहतो आणि ऑपरेशनची तयारी झाली की बोलवतो"

                
    
    
काही जुनाट, वापरून वापरून जुने झालेले, लहान मुलांनी खेळ म्हणून बाबांच्या खिशातून पेन घेऊन मासिकांवर, पेपर वर आपली कला सादर केलेले असे काही  मासिके चाळत बसलो होतो..जेमतेम काही वृत्तपत्र, मासिक पहिली.. बसायला एकदम ऐसपैस सोफा होता, त्यावर ऑफ व्हाईट रंगाचे कव्हर होते. काही मुलांनी पांढरा कागद समजून त्यावर पण आपली चित्रकारी केलेली होती. त्या मारलेल्या रेषा, आकार यात मी काही चित्र शोधण्याचा  खेळ करत वेळ घालवत होतो. 

    लोक आत येत जात होते, काही तरुण मुली, धीराने आत जात होत्या आणि चेहऱ्यावरील भीती, दुःख लपवण्यचा प्रयत्न करत होत्या, म्हणजे आपण रस्त्यातून चालताना चुकून जर पडलो तर आपला चेहरा कसा होतो , आपल्या कोणी पाहिलं का?, आपलं हसं होईल का? हे असे विचार तेव्हा चटकन मनाला शिवून जातात तसेच काहीसे चेहरे या मुलींचे होत होते. लहान मुलं तर टाहो फोडून रडत होते.

    मला, वाट पाहण्यात कधीच कंटाळा येत नाही, जिथे माणसांचा वावर आहे तिथे तर वेळ अगदी आरामात जातो. असेच माणसं पाहत, त्याचे वेगवेगळ्या स्वभाव,वागणूक पाहत बसलो. इतक्यात एक अगदी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कपडे घालून वावरतात तसे कपडे घातलेली मुलगी समोर आली आणि हळू आवाजात बोलली, पहिल्यांदा ती इतकी तोंडातल्या तोंडात बोलली की मला आधी समजले नाहीच. बहुदा, तिच्या तोंडाच्या हालचालींना काही मर्यादा येत असाव्यात.

" तुम्ही आत जाऊ शकता, ऑपरेशन सुरू करता येईल"

मी मोठ्ठा श्वास घेऊन ते गच्च काचेचं दार ढकलून डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेलो.

    साधारण एक तास, मध्ये मध्ये ग्लासातील पाणी पीत, थुंकत, त्रास सहन करत एकदाच ते ऑपरेशन पार पडले. मी फक्त माझे डोळे उघडुन माझ्या तोंडात काय काय जातंय आणि काय काय बाहेर येत आहे हेच पाहत होतो. डॉक्टर अगदी सफाईने ते सगळे हत्यार वापरत होते.

" आता हा कापूस लावतो, एका तासांनी काढा आणि रक्त आलं तर...परत या...या गोळ्या घ्या...आणि काही वेळाने गार काही खा.म्हणजे आईस्क्रिम ई." पाठीवर एक आश्वासक हात ठेवत मला 'बाहेर बसा काही त्रास झाला तर सांगा नाहीतर घरी गेलात तरी चालेल' असा निरोप देऊन बाहेर पाठवले.

    मी रात्रभर प्रवास करून घरी पोंचलो आणि बॅग टाकून लगेच हॉस्पिटलला पळालो. ताई आणि बाळाला पाहिले. ते छोटे छोटे डोळे, छोटे छोटे बोटं, नाजूक शरीर, वजनान हलकी फुलकी अशी तिला पाहून डोळ्यात पाणी आले. 
' फुलपाखरू' इतकी नाजुक शरीरयष्टी पाहून माझ्या तोंडून तेव्हा हे शब्द निघून गेले.

    घरी येऊन काही तरी खाल्ले, काल दुपार पासून उपाशीच होतो. मग आई बाबा यांना काल बसमध्ये बसायच्या पूर्वी अक्कल दाड काढून आलो आणि आत ३-४ टाके आहेत हे पण सांगितले. बाबांनी तर पाठीवर थापच मारली

" कमाल आहे बाबा तुझी!!!मग जेवण रे?"
" मँगो फ्रूटी"
" म्हणजे?"
" दुपारी जेवलो आणि संध्याकाळी ऑपरेशन झाले, मग कसे जेवता येणार, बस मध्ये येता येता मँगो फ्रूटीच्या छोट्या ४ बाटल्या संपल्या"

    आमचे लहान फुलपाखरू आणि ताई  हॉस्पिटल मधून घरी परत आल्या. तरी मला एकट्याला  तिला उचलून घेण्याचे धाडस होत नव्हते. बाकी धाडस करू शकत होतो पण हे धाडस करणे होत नव्हते. हातात कोणी दिले तर घेणे सोपे व्हायचे. बारा दिवस झाले, पाळण्यात घालून बारसे झाले आणि या छोट्या फुलपाखराला नाव मिळाले                                                                                  ' अपूर्वा '     


    अपूर्वा मोठी भाग्याची; पत्रिकेत अतिशय उत्तम योग आणि ग्रह घेऊन जन्माला आली आहे . आज पण ते तिचे लहानपण आठवते. लहान असल्या पासून मामा आणि मामी यांच्या खूप अंगावर आहे, मामा मामी जे करतात, जे खातात ते ते आमच्या बरोबरीने तिला करायचे असते.  मामा तर मस्ती करण्यासाठीच, धाडस, कोणत्या पण संकटाला न घाबरणे, तिला मामा मदतीला असला की मग काही काळजीच नसते, मग ते झाडावर चढणे असो, उड्या मारणे असो,मामा बरोबर गाडीवर बसून जाणे असो, समुद्राच्या पाण्यात मनसोक्त खेळणे, कोणाला त्रास देणे असो.. अशा अनेक  उद्योगात मामा मामीच्या ही कायम सोबत असतेच.

                                        

    काही वर्षांनी एकदा मी आणि ती रात्रीचे जेवण झाल्यावर होतो खेळत बसलो होतो. तिला आता इंग्रजी शाळेत वाक्य वाचता येत होते. पण मराठी नीट वाचता येत नव्हते.( इंग्रजी माध्यमामुळे ) आमच्या खोलीत एक मोठा बोर्ड होता, तिला मराठी काही वाचता येत नव्हते. हे काय लिहले आहे याची  तिला उत्सुकता होती.

" काय बघते आहेस बोर्डकडे?"
"मामाsss, हे काय लिहलं आहे रे?"

निरागस मनाने आणि मराठी वाचता येत नसल्याने तिने मला विचारले

" अगं यात लिहलं आहे की रोज आईचे ऐकावे, नीट वागावे,दुध प्यावे, मोठ्यांना त्रास देऊ नये, आई बाबा, आजी आजोबा यांना रोज नमस्कार करावा" खरंतर हा बोर्ड माझ्या व्यवसायिक जाहिरातीचा होता. पण मी तिची गंमत करायचे ठरवलं होते.
" हो का?"

मला वाटलं तिचा माझ्यावर विश्वास बसला.

" आजोबा, आजोबाsss" बाबांचे बोट धरून तिने त्यांना पण त्या बोर्ड जवळ आणून उभे केले.

"आजोबा यात काय लिहले आहे हो, सांगा बरं? तू गप्प बसं मामा" तिने तोच प्रश्न हुशारीने क्रॉस टॅली करण्यासाठी त्यांच्या समोर टाकला आणि माझ्याकडे रागाने पहिले.

बाबांनी पण मी जे सांगितले तेच तिला परत सांगितले, उलट त्यांनी अजून दोन गोष्टी वाढवून सांगितल्या, या अनपेक्षित उत्तरामुळे अपूर्वा एकदम गांगरून गेली.

" तुम्ही दोघं पण मला फसवतात!!!"

माझे हे बोलणे कदाचित बाबांनी ऐकले होते, म्हणून ते माझ्याच प्रमाणे बोलले.

तिची मात्र चिडचिड झाली. अपूर्वाला हे  नक्की माहीत होते की मामा आपल्याला फसवतोय. पण आता तिच्या समोर काहीच उपाय राहिला नाही.

" बरं बरं, तसंच लिहलं आहे" म्हणतं पाय आपटित ती तिथून निघून गेली.

    प्रचंड स्वाभिमानी, अभ्यासू, चिकाटी, सहजा सहजी पराजय न पचवू शकणारी. असे आमचे हे फुलपाखरू आज  दहा वर्षाचे झाले आहे. दिनांक ११ मे २०११ रोजी जन्मलेल्या या फुलपाखराला आता पुढील आयुष्यामध्ये आकाशात उंच उंच फरारी मारण्यासाठी अगदी गरुडासारखे पंख मिळो हीच आजच्या दिवशी (दिनांक:- ११ मे २०२१) देवाला प्रार्थना.

                                   

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०


7 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले