Monday, May 24, 2021

"बुक शेल्फ, मुक्त लेख कार्यक्रम"

"बुक शेल्फ, मुक्त लेख कार्यक्रम" 


मस्कार,

    बुक शेल्फ, पुस्तक विक्री आणि प्रकाशनने काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या मुक्त लेख कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थीचे लेख खाली देत आहे. आम्ही ही कोणतीच स्पर्धा घेतली नाही म्हणून याला आम्ही फक्त कार्यक्रम असे संबोधले. सहभागी सर्वांचे लेख/कथा/ अनुभव खाली देत आहे.

    कृपया सर्वांनी खालील त्यांचे मुक्त लेख वाचून अवश्य प्रतिक्रिया कळवाव्यात. जेणे करून त्यांना प्रोत्साहन मिळेलं.

धन्यवाद,

बुक शेल्फ, निखील देविदास वझे
९०११०९६२५०

१) मी बडबडी 

    तुम्हाला माहिती आहे का की माझ्या घरातले सगळे मला बडबडी म्हणतात.  मला सांगा बडबड करणं काय वाईट असतं का? त्याशिवाय आपण एकमेकांशी संवाद कसा साधणार? आता साधं उदाहरण घ्या ... आई ऑफिसला जायच्या गडबडीत असते तेंव्हा मी नेमकी उठलेली असते. मग मी आई पाशी जाते आणि तिला विचारते. 

"आई तू पोळ्या कशा गं लाटतेस? किती गोल गोल होतात तुझ्या पोळ्या.  मला शिकव ना, मला दे ना करायला." तर आई म्हणते "मनू जा बरं बाहेर जाऊन खेळ. मला नको त्रास देऊ आत्ता." 

मग मी जाते आजीकडे, "आजी आजी तू काय करत आहेस? जरा माझ्याशी खेळ की." तर आज्जी म्हणते "अनिशा मी आत्ता चहा पिते आहे की नाही. नंतर खेळूया आपण." 

मग मी आपली जाते बाबाकडे, "बाबा चल, आपण सायकलिंग करूया.  तू तरी खेळ की माझ्याशी." तर बाबा म्हणतो, "अगं बंतुल्या मला आत्ता ऑफिसचं काम करायचं आहे.  उद्या खेळू हं आपण." 

    सगळेजण आपले बिझी आहेत आणि कुणीच कुणाशी बोलत नाही. मीच बोलले नाही तर मग काय होणार? तरीही मला आपले सगळे जण बडबडी म्हणतात. आता सांगा काय करायचं मी तरी? 

© अनिशा अभ्यंकर, 
मोबाईल ९८३४६६११३१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२) विद्वत्तेची पूजा


    कुंथलगिरी नावाचं एक राज्य . ह्या  राज्याचा व्याप राजाने प्रजेच्या सहाय्याने मोठा केला होता. राजाचं नाव होतं युगंधर. हा राजा मोठा प्रजाहितदक्ष राजा होता. पण राजाच्या एका दुर्गुणामुळे  त्याच्या सद्गुणांवर चादर ओढावून घ्यायला सुरुवात झाली होती. हा होता राजाचा स्वतःचाच  मोठा शत्रू 'अहंकार' याची चादर  काढणं हे प्रधानजींनाच  करावं लागणार होतं. प्रधानजी सतत वेगवेगळ्या युक्त्या काढून राजाचा हा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करत असत.

    तशातच गावात एक शारंगधर नावाचा विद्वान ब्राह्मण येऊन राहिला होता. आपल्या विद्वत्तेमुळे त्याचा विविध प्रकारे लौकिक वाढतच  जात होता. याच संधीचा प्रधानजींनी  फायदा घ्यायचे ठरवले. त्यांनी जाऊन मुद्दामच राजाच्या मनात शारंगधराबद्दल काहीबाही  भरविले. त्यामुळे राजाच्या मनात त्याच्याबद्दल राग उत्पन्न झाला आणि त्याने शारंगधराला उलट सुलट प्रश्‍न विचारुन त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

    ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी शारंगधर दरबारात हजर झाला राजाने त्याला काही प्रश्न विचारले त्याने त्याची अगदी चोख आणि उत्तम स्‍पष्‍टीकरणासहित उत्तरे दिली .राजा त्याच्या  हजरजबाबीपणावर  फार खुश झाला पण शेवटच्या उत्तराने मात्र राजाचा अहंकार नष्ट झाला राजाने असा प्रश्न केला की, "मनुष्याचे स्वतःचे असे शत्रू कोण"? त्यावर शारंगधर उत्तरला, "हे नृपश्रेष्ठा, अहंकार आणि कुविचार!!! आपल्या मनाने जर वाईट विचार केले तर मनुष्य आत्मविश्वास हरवून बसतो... जे वैरी न चिंती ते मन चिंती. याच प्रमाणे अहंकाराचे देखील आहे. मीच श्रेष्ठ या मनातील भावनेमुळे मनुष्याने रचलेली गुणांची, यशाची इमारत अहंकाराच्या एका जड विटेमुळे ढासळून जाते आणि ती ढासळली की उभारणं फार कठीण जातं." 

    राजाला वाटलं हे आपल्या बाबतीतच नाही का? मीच श्रेष्ठ राजा या मनातील अहंकारी भावनेमुळे आपण या महापुरुषाची परीक्षा घेतली, आपल्याला ह्याचा राग आला राजाने त्याचे पाय धरले आणि सारी कबुली दिली आणि शेवटी उद्गारला 

 विद्वत्वं च नृपत्वं च नैव तूल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजयते ।   

© कु . आर्या विवेक पर्वतीकर.
+91 84595 95321

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३) माझे घर प्रसन्न... 

    ला अजूनही आठवतं , अगदी स्वच्छ आठवतं. बाकी लहानपणीचं काही आठवत नाही पण ते घर मात्र मनात घर करून राहिलं आहे. गदिमांच्या कवितेतील 'खेड्यामधले घर कौलारू...' असं ते घर होतं. 

     कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील छोटसं गाव 'तुळशी'. निसर्गसंपन्न , कृषीसंपन्न , टुमदार गाव... तिथे आमचं घर आहे. काळानुरूप त्या घरात अनेक बदल केले आहेत खरे, पण जुन्या घराची आठवण ती काही वेगळीच.... आजही त्या आठवणी माझ्यासोबत आहेत.

     घरासमोर मोठं अंगण होतं. आवारातील आंबा , फणस या झाडांची सावली अंगणात पडायची. वाऱ्यावर ताल धरून ती झाडे अंगणात छायानृत्य करायची. आठवड्यातून एकदा अंगण गायीच्या शेणानं सारवलं जाई. शेणाच्या सुगंधात ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून मी मोठे झोके घ्यायचे. मला येत असणारी सगळी गाणी , कविता , बडबडगीते म्हणायचे. घरातील जमिनी , भिंती मातीच्या होत्या. त्यावरही शेणाने सारवले जाई. दिवसभर ती जमीन सुंदर दिसे. सारवलेल्या अंगणात  तुळशी वृंदावन आणि काढलेली रांगोळी सुरेखच दिसे. उन्हाळ्यात कैऱ्या अंगणात पडायच्या. पावसाळ्यात त्या अंगणात सगळा चिखल व्हायचा. हिवाळ्यातील पौर्णिमेला अंगणात सुंदर प्रकाश पडलेला असे.

    दुपारी जेवायला गुरगुटा भात त्यावर तूप - मीठ , मेतकूट किंवा भाजी - भाकरी , पोळी - भाजी असा साधाच पण अत्यंत रूचकर आहार असायचा. ओल्या खोबऱ्याने आणि चुलीच्या वासामुळे कोणताही पदार्थ 'राजमान्यच' व्हायचा. केळीच्या लांब पानावरच जेवणं व्हायची. जेवणानंतर पुन्हा शेणाचं पाणी टाकून जमीन सारवली जायची. 

    मग दुपारभर पडवीतल्या झोपाळ्यावर आडवं पडून पुस्तक वाचणं , वाचता वाचता  तिथेच झोपणं.... आहा.... काय दिवस असायचा.... संधीप्रकाश डोळ्यावर आल्यावर उठायचं. छान वारा सुटलेला असायचा. आमचा गडी चरून आलेल्या गायींची धार काढत असायचा. गाय वासराला चाटायची. गाय आणि वासराचा मौन संवाद चाललेला असे. त्या वातावरणातच आम्ही खेळायला , फिरायला बाहेर पडायचो.  परतताना गणपतीच्या देवळात जायचो. घरात जाण्याआधी गायीला चारा घालून यायचो. मग परवचा म्हणून , जेवून झोपायचो.

    स्वच्छ ,शुध्द हवा, आनंदी जीवन असं आयुष्य होतं.कसला ताण - तणाव नसायचा. सुख म्हणजे नक्की काय?  या प्रश्नाचं उत्तर म्हणजे... ते खेड्यातील जीवन होतं. सुखसोयी कमी होत्या हे खरं असलं तरी आनंद मिळवायला सुखसोयी लागत नाहीत.

     कालांतराने आम्ही पुण्याला आलो. येथे सुखसोयीयुक्त मोठं घर घेतलं पण ते घर नेहमीच माझ्या मनात राहिलं. आजही त्या आठवणी जाग्या होतात , ते घर , ते जीवन स्वप्नात येतं आणि मन हुरहुरतं. कधी कधी हे जादूई महानगर सोडून तिकडे जाऊन सुखात रहावं असं वाटतं. गावात राहून दोन वेळा खाल्लेला मऊभात , आनंद आणि तणावमुक्त आयुष्य आपल्याला दीर्घायुषी बनवेल.

    असं आमचं प्रसन्न घर कायमसाठी माझ्या मनात राहिलं.... शेवटी मी एवढंच म्हणेन की 

 "राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ,               

 ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या...."

©वेदश्री विनायक देशमुख.
+91 97302 53960

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


5 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले