Tuesday, April 27, 2021

“रायगड, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीस विन्रम अभिवादन”

रायगड, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीस विन्रम अभिवादन

    हिवाळ्याचे नुकतेच दिवस सुरू झालेले होत.
गाडीवरून कोकण फिरायला जाऊ असा विषय घरात सुरू झाला....
मग कुठे? सोबत कोण कोण येणार ? हा विषय सुरू झाला....
होय नाही करत शेवटी ती आणि मी हेच नक्की झाले....
"
मग कधी जाऊयात?"
"
दोन दिवसांनी जाऊ, सुट्टी येत आहे...जाऊ मग, या दोन दिवसात आपली पॅशन सर्व्हिसिंग करून घेतो मग जाऊ...सामान मात्र आपण गाडीवर जातोय या हिशोबाने घे म्हणजे झालं...अशी सूचना वजा विनंती केली..." बाकी तिला विनंतीच करावी...
     
पहाटे पहाटे म्हणजे अगदी अंधारातच घर सोडले, अंतर जास्त होते...त्यामुळे पहाटे म्हणजे अगदी ३.३० ला निघालो....सकाळी सकाळी शांत रस्ता होता, हायवे वरून जाताना गारवा लागत होताच...तसे गरम कपडे अंगात घातलेले होते, पण मुख्य म्हणजे हेल्मेट सक्ती नव्हती त्यामुळे डोक्यावर कोणतेच ओझे नव्हते..पण चेहऱ्याला वारा लागत होता. सकाळी रस्ता तसा रिकामा होता...एखादा माल वाहतूक करणारा ट्रक, कंटेनर, असे क्रॉस करत करत चांदणी चौक गाठला....
     
गाडीची पेट्रोल टाकी आधीच एकदम फुल्ल करून घेतल्यामुळे निवांत गप्पा मारत मारत गाडी चालवत होतो...मुळशी परिसरात बॅक वॉटर मुळे जरा गारवा जास्तच जाणवायला लागला....आता जवळ जवळ तांबडं फुटायला लागले होते आणि सकाळच्या आकाशात मुक्त विहार करणारे विविध पक्षी दिसायला लागले...
   
सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि गारव्यात गाडी चालवण्याचा आनंद घेत होतो...मागून फक्त रनिंग कॉमेंट्री सुरू होती...
"
ते बघ पाण्यात काय आहे.....भाताचे खळं पहा...तो पक्षी पाहिला का? आंब्याची किती झाडं आहेत न रस्त्यात....अरे समोर पहा...म्हैस रस्ता ओलांडत आहे...खड्डा.. !!! किती मोठे खड्डे...चांगला रस्ता नाहीच का?....करवंदाची पण कित्ती झाडं आहेत...मला भूक लागली आहे...."
'
होss ' हे एकच बचावाचे वाक्य ऐकवत गाडी चालवत होतो.
      आता ताम्हिणी घाट सुरु झाला...मी पहिल्यांदाच तिला घेऊन असा गाडीवर लाँग ड्राईव्हवर आलो होतो. तशी मनात भीती आणि दडपण होतेच पण फक्त ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही इतकेच. ताम्हिणी घाटातून जाताना... वळणा वळणाचा रस्ता, खोलखोल दऱ्या,घनदाट जंगल, साग, आंबा, कदंब, सोनमोहर असे अनेक वृक्ष तर होतेच आणि रस्त्याच्या दुतर्फा करवंदाची जाळी पण होती.

ताम्हिणी घाटातील विशाल दरी

   वाटेत एका ठिकाणी थांबून आवडीचा नाष्टा केला आणि परत प्रवास सुरू केला...ताम्हिणी घाटचा रस्ता खूप खराब होताच...मध्ये मध्ये काही चांगला भाग आला की आपोआप गाडीचा वेग वाढायचा...आम्हाला अजून बरेच अंतर गाठायचे होते....गर्द झाडीत लपलेले एक 'वंजाई देवीचे' मंदिर या घाटात आहे, अनेकांना ते माहीत नव्हते पण आता अनेक लोक येत जात आहेत.हे मंदिर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक रस्ता आत जातो तेथे आहे. 

    घनदाट अरण्यात हे मंदिर आहे, आजूबाजूला साग, फणस, आंबे, आणि अन्य वृक्ष आहेत.आम्ही देवीचे दर्शन घेतले, पुढील प्रवास सुरक्षित आणि सुखरूप घडावा अशी प्रार्थना केली आणि परत निघालो.आपण पण हे मंदिर अवश्य पहावे. निरव शांतता  येथे आपल्याला अनुभवता येते, रात किडे, पक्षी, पायाखाली आलेल्या सागाच्या मोठ्या वाळलेल्या पाना खेरीच कोणताच आवाज तिथे येत नाही.अगदी काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरील रहदारीचा पण नाही...
                                     

वंजाई मंदिर

ताम्हिणी उतरून खाली आलो, विळे एमआयडीसी मधून कोकणच्या वाटेवर लागलो...निजामपूरला आलो आणि आता माणगावकडे जाणाऱ्या रस्त्याला लागणार तितक्यात मागून आवाज आला...

" थांब थांब!!"

"काय झाले ग?"

"अरे मागे एक बोर्ड गेला, वळ वळ मागे" 

"कोणता"

"अरे तू वळ तर आधी!!!.."

मागे वळून बोर्ड जवळ आलो,
"
चल जाऊयात"
दोघांच्या पण तोंडातून एकच वाक्य निघाले...कारण
त्या बोर्ड वर रायगड, पाचाड, महाड यांचे अंतर लिहलेले होते.हे अंतर जास्त नसल्यामुळे आधी रायगड दर्शन घेऊन मग पुढे कोकणात जाऊ असा विचार नक्की केला.

आम्ही रस्ता तर निवडला....पण तो रस्ता म्हणावा का? असाच होता.अंतर कमी होते...बहुदा निधी अभावी, किंवा इच्छाशक्ती अभावी तो खितपत एकाकी पडला होता. रस्तात खडी, दगड, खड्डे, काय विचारू नका?....तसेच ३०-४० च्या गतीने कधी दुसऱ्या, पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या गिअर टाकत गाडी हाकणे सुरू होते...हो हकणेच कारण जनावर जेव्हा कंटाळून बैलगाडी ओढतात त्याला हाकणे म्हणतात, तसेच माझे पण झाले....एकतर वेळ जात होता...आणि रस्ता त्रास देत होता...
 
"
अरे संभाळून"
"
तू जाते का चालत उतरून खाली?, मी येतो हळू हळू... आणि हळू हळू पायी जा...”
मी अशा जागी आलो होतो तिथून जवळ जवळ २०-३० फूट रस्ता सरळ खाली उतरत होता...आणि रस्त्यात फक्त खडी,लाल माती..त्यावरून गाडीचे चाक आणि गाडी दोन्ही सरकत होते...मला पक्क आठवतं, मी जवळ जवळ पूर्ण हाताच्या जोरावर तो तीव्र उतार पार केला.. डाव्या हाताला दरी, उजवीकडे चर खणला होता...कसा बसा उतरून खाली आलो, अरुंद, काम बंद पडलेला पुल आला, त्यावरून गाडी ओलांडून पैलतीर गाठला....





       
मागून ही आली, आणि पाहतो तर काय ? असाच रस्ता!! पण आता चढण आले. गाडीवर काही अंतर तिला बसवलं...पहिला...दुसरा...गिअर करत गाडी चढून वर आलो...हातांना आता वेदना होत होत्या त्यांच्यावर खूप भार पडला होता...
     
जरावेळ सावलीत आराम केला आणि परत रायगडच्या दिशेला निघालो. या रस्तावर अनेक भाताच्या गवताच्या मोठ्या मोठ्या गंजी दिसत होत्या. काही वाड्या आम्हाला क्रॉस होत होत्या, या रस्त्यावरून आपण थेट पाचाड ला पोंचतो. या सगळ्या रस्त्याच्या अडचणी मुळे पायथा गाठायला खूप उशीर झाला...त्यामुळे दोघे पण वैतागुन गेलो होतो... खरं तर गडावर जायचे होते...पण वेळेची अडचण झाली त्यामुळे आता येऊ ते थेट गडावर मुक्काम करायलाच, असा संकल्प करून तिथून निघालो.     

भाताच्या गवताच्या गंजी

      आपल्याला प्रत्यक्ष रायगडावर जाऊन दर्शन घेता आले नाही. पण किमान कळसाचे दर्शन घेता आले...ज्या महाराजांनी आपल्याला नियोजन शिकवले त्यांचाच आदर्श घेऊन परत नियोजन करून येऊ असे दोघांनी पण ठरवले.
     
मध्ये अनेक वर्षे गेली, काही न काही  कारणाने रायगडावर जायला जमत नव्हते.पण एकदा तशी संधी आली आणि लगेच संध्याकाळी पायथा गाठला, रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याची मोहीम मी आखली, तसे ऑफिस मधील सर्वांना सांगितले, काही मुलींच्या घरी रीतसर परवानगी घेतली, त्यांच्या घरातील लोकांना विश्वास दिला आणि आम्ही गडाचा पायथा गाठला.
   
रात्रीच्या अंधारात, आधी पायऱ्या, मग अरुंद पायवाट,आणि सोबतीला काही नवखे, काही अती उत्साही, यांना घेऊन चढत हिरकणी दरवाजाजवळ आलो. इतिहास आवडीचा असल्यामुळे वाचन, अभ्यास केला जातोच, त्यामुळे त्या दरवाजाची विशेष बांधणी, त्याचे महत्व सगळ्यांना सांगू शकलो.         

हिरकणी दरवाजा
    आता गडावर अंधार होता...एका झोपडीत राहायची सोय झाली...सगळ्यांनी जेवण केले आणि झोपडी पासून जरा दूर जाऊन शेकोटी पेटवली, त्याच्या उबेत सगळे जण गप्पा करत बसलो, अनेकांना या गडाचे महत्व,कोण कोणत्या वास्तू आहेत याची माहीती नव्हती....
"
भाई बोलीये न?क्या क्या है यहाँ ?"
आमच्यातील एकाने विचारले.
" दादा तूच सगळ नीट 
सांग"
"बरं बरं सांगतो,
या रायगडावर महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली . त्याआधी  स्वराज्याची राजधानी राजगड होता. पण या गडाचे एकूण क्षेत्रफळ,सलग उपलब्ध असलेले पठार जास्त आहे, यामुळे या ठिकाणी राजधानी हलवण्यात आली, राजांचा राज्याभिषेक आणि ते सिंहासनारूढ याच गडावर झाले. राजांचे दुर्दैवी निधन येथेच झाले, त्यांची समाधी पण आहे इथे. आपल्याला उद्या या सगळ्या जागा पहायच्या आहेत, त्यामुळे झोपा लवकर, सकाळी लवकर उठून जायचे आहे.
"अरे, दादा सांग की अजून,लेकाss, मर्दा असं अगोदर ताणायचं आणि....मग..सांग बघू आता"
"अरे,तुमच्या झोपा झाल्या नाहीत तर दमाल उद्या, आणि गड पहायचा अर्धवट राहील"
"झोप तर रोजचीच आहे न बेsss,सांग बरे मला,"
" हो न दादा तुला जे जे माहीत आहे ते सांग बर”.

आमचे हे सगळे मित्र मैत्रिणी महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेले होते.
आता मात्र सगळेच पेटले, आणि  सगळा इतिहास ऐकण्यासाठी माझ्या मागे लागले.
 
     महराजांची मुद्रा काय होती, कोणाला माहित आहे का?”, कोणीच नीट सांगू शकले नाहीत...

" प्रतिपंच्चद्रलेखेव |
वर्धिष्णुर्विश्ववंदिता |
शाहसुनोः शिवस्यैषा |
मुद्रा भद्राय राजते ।
म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारी, विश्वाकडून वंदित अशी ही शाहजी पुत्र शिवाजी याची मुद्रा कल्याणार्थ विराजत आहे.....”मी सांगायला सुरुवात केली.
    रात्र भर शेकोटीत लाकडं टाकत त्या सगळ्यांना ओझरते, मला जितके माहीत होते आणि मला जितके सुचले तितके शिवकथन त्या सगळ्यांना केले, शिवाजी महाराजांचे  चरित्र सांगताना  रात्र कधी संपली समजलेच नाही. पहाट वारा सुटला, आता शेकोटी मध्ये फक्त शांत झालेले निखारे शिल्लक होते, पण सगळ्यांच्या मनात मात्र अग्नी पेटला होता. तांबडं फुटलं , पक्षी आपल्या आपल्या घरट्यातून बाहेर पडले होते,सूर्योदय पण झाला होता, वातावरण एकदम प्रसन्न झाले होते...     

                    

मनोरे आणि दूर जगदीश्वर मंदिर
  रात्री काहीच नीट दिसत नव्हते आता मात्र सगळ स्पष्ट , सुंदर दिसत होते, दूर वर दिसणारे जगदीश्वर मंदिर, समाधी, राजसभा, सगळे दिसत होते...

    रायगडच्या सर्व वास्तू एका दिवसात पाहून होणे शक्यच नाही, त्यामुळे आम्ही आधी मुख्य जागा पाहू आणि वेळ शिल्लक राहिला तर बाकीचे पाहू असे नक्की केलं....
   
सगळे आवरून आधी जगदीश्वर मंदिरात आलो, केवळ आलौकिक वास्तू, आपले आराध्य छत्रपती या मंदिरात कितीवेळा आले असतील,या वास्तूला त्यांचे पाय लागले असतील, त्यामुळे मंदिरात दर्शन घेताना मनात अनेक भावना येत होत्या...अहो भाग्य असेच काहीसे वाटत होते.
"
दादा हे काय आहे रे?"
"
अरे वा गेली का तुझी नजर यावर, हुशार आहे माझी बहिण!!, थांब बाकी आले की सगळ्यांना एकत्रित सांगतो, या रे सगळे लवकर इकडे, समोर दिसतंय ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी मंदिर, हो हे मंदिरच आहे...याला पण मंदिरच म्हणावे लागेल....
त्याच्या मागे वाघ्या कुत्र्याची समाधी पण आहे, त्याबाबत नंतर सांगतो...त्याआधी मागे वळून जरा खाली पहा...”मी खाली पायरीकडे हात दाखवला.
"
हे काय लिहले आहे, कोणत्या भाषेत आहे?"
"
थांबा मी सांगतो, हा गड ज्यांनी पूर्ण वास्तू सहित बांधला ते हिरोजी इंदलकर यांच्या स्मरणार्थ हा लेख कोरून येथे बसवला आहे...आपली जागा कायम शिवचरणी असावी हीच त्यांची इच्छा होती.
"
सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदलकर " बस हीच इच्छा होती त्यांची..

                            

"सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदलकर "

      त्या पायरीचे दर्शन घेऊन आम्ही समाधी जवळ गेलो...खालून त्याचे दर्शन घेतले आणि शिवाजी महाराजांचे स्मरण करण्यासाठी सगळे खाली बसलो.
"
महाराजांना खूप ताप आला, त्यामुळे ते आजारी पडले, इतिहासात अनेक खऱ्या-खोट्या गोष्टी आहेत, वादविवाद आहेत,पण एक सत्य नक्की आहे की याच रायगडवर आपले शिवाजी महाराज आपल्याला कायमचे सोडून गेले, या स्वराज्याचा पहिला हिंदू महाराजा आपल्याला याच ठिकाणी सोडून गेला...जाताना अनेकांना प्रेरणा तर दिलीच, अनेक दानधर्म केले, आणि शांत पणे देह सोडला...पूर्ण राजचीन्हांनी युक्त अशी प्रेतयात्रा तिथेच निघाली, महाराजांच्या शरीराला विधिपूर्वक मंत्राग्नी दिला...आणि आपल्या स्वराज्याचे महाराज पंचत्वात विलीन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध पौर्णिमा,हनुमान जयंती. इंग्रजी दिनांक ३ एप्रिल १६८० दुपारी बारा वाजता....हे सांगताना पण माझे डोळे भरून आले होते” या समाधीचे महत्वच असे आहे कि आपले डोळे भरूनच येतात. तितक्यात मागून कोणी तरी घोषणा दिली...
“छत्रपती श्री शिवाजी महाराज की जयsss        

समाधी मंदिर

       आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही प्रचंड ऊर्जा, सकारात्मक प्रेरणा, संघटन,अशा अनेक गुणांची थैली भरून आम्ही नाणे दरवाज्यातून (नाणे म्हणजे लहान ) गड पायउतार झालो...तिथे हनुमंताचे दर्शन घेतले.

नाणे दरवाजा
शक्तीचा महामेरू, हनुमंत मंदिर

         आज फक्त एकच सांगतो...आपल्या आयुष्यात पूर्वी संकटे आली असतील, कदाचित पुढे पण येतील .त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून त्यां संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळो हीच प्रार्थना.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी रोजी त्यांना विन्रम अभिवादन.

 छत्रपती श्री  शिवाजी महाराज कि जयssss

------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 

3 comments:

  1. खूपच सुंदर , जिवंत वर्णन ... धन्य तो रायगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि त्याच रायगडी महाराजांनी चिरनिद्रा घेतली 🙏

    ReplyDelete
  2. Aj hi post wachyla milali khup chan watla .

    ReplyDelete
  3. जबरदस्त.... जिवंत वर्णन केले आहे, खरंच हे त्या काळचे प्रसंग आणि अविस्मरणीय , क्षणा बद्दल वाचू तितके कमीच होईल ना!!

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले